दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत बिबट्यांचा अडसर
हौशी कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण
दौंड; बारामती वार्तापत्र
मागील महिन्यात सोलापूर ,बीड ,नगर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने नागरिकांना भेटीस धरले होते. त्यानंतर वन विभागाच्या परवानगीने या बिबट्याला मारण्यात आले. ही घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
सध्या सगळीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. उमेदवार, नेते हे प्रचारासाठी वाड्या-वस्त्यांवर ,गावात फिरत आहेत. मात्र दौंड तालुक्यातील सालु-मालु येथे चार बिबट्यांचे दर्शन झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रात्री-अपरात्री घोंगडी बैठका घेणारे कार्यकर्ते यावेळी मात्र सातच्या आत घरात अशा स्थितीत असल्याचे दिसत आहे
यामुळे काही हौशी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.
नागरिकही घराबाहेर पडण्यास दचकत आहेत.शेतातील कामे ही खोळंबली असल्यामुळे वनविभागाने तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे