दौंड तालुक्यात चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या पाच गुऱ्हाळ चालकावर जप्तीची कारवाई
5 लाख 72 हजार 786 रूपये किंमतीचा साठा जप्त
दौंड तालुक्यात चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या पाच गुऱ्हाळ चालकावर जप्तीची कारवाई
5 लाख 72 हजार 786 रूपये किंमतीचा साठा जप्त
दौंड; प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दौंड तालुक्यात चुकीच्या पद्धतीने गुळ उत्पादन करणाऱ्या पाच गुऱ्हाळ चालकांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार प्रशासनाने मागील काही कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये काही गुळ उत्पादक चुकीच्या मार्गाने गुळ उत्पादन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतीत कार्यशाळा घेवून मार्गदर्शन केल्यानंतरही बरेच चुकीचे प्रकार होत असल्याची माहिती मिळाल्यावरून 22 ऑक्टोबर 2021 रोजी दौंड तालुक्यातील 5 गुऱ्हाळ चालकावर नमुने, जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 4 गुऱ्हाळ चालक हे विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने 22 ऑक्टोबर 2021 रोजी केलेल्या कारवाईत दिलदार मुर्तुजा गुळ उद्योग केडगाव, समर्थ गुळ उद्योग केडगाव, लक्ष्मी गुळ उद्योग पिंपळगाव, मे. कापरे गुळ उद्योग पिंपळगाव व मे जानवी गुळ उद्योग कानरखेड यांच्याकडून गुळ तसेच भेसळीसाठी वापरण्यात येत असलेले अपमिश्रके असे एकूण 10 नमुने तपासणीसाठी घेवून 5 लाख 27 हजार रुपये किंमीतचा 15 हजार 487 किलो गुळ व 45 हजार 770 रुपये किंमतीचे 1 हजार 358 किलो असा एकूण 5 लाख 72 हजार 786 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई प्रशासनाचे सहायक आयुक्त संजय नारागुडे, विधी अधिकारी संपतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटी प्रकरणी नियमानुसार कारवाई करण्यात येत असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व गुऱ्हाळ चालक, मालकांना परवाना घेवूनच कायद्याअंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करुनच गुळ उत्पादन करण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.