धक्कादायक प्रकार;बारामतीत ५४ वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाला नग्न व्हिडीओच्या धमकीने ब्लॅकमेल

धक्कादायक प्रकार;बारामतीत ५४ वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाला नग्न व्हिडीओच्या धमकीने ब्लॅकमेल
दोघांविरोधात गुन्हा दाखल
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेकडून व्हिडीओ कॉलद्वारे शिक्षकाला नग्न होण्यास भाग पाडण्यात आले आणि त्याचे स्क्रीनशॉट व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी या शिक्षकाकडून तब्बल 1 लाख 15 हजार 350 रुपये उकळले.
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अभिषेक विठ्ठल पांचाळ (रा. चाकण, मूळ रा. उदगीर, जि. लातूर) आणि सिद्धांत माधव गगनभिडे (रा. चाकण, मूळ रा. पाटोदा बुद्रूक, जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मे 2025 मध्ये शिक्षकाला एका महिलेच्या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर चॅटिंग सुरू झाले आणि इन्स्टाग्रामवरही संपर्क वाढला. काही दिवसांनी त्या खात्यावरून नग्नावस्थेतील महिलेने व्हिडिओ कॉल करत शिक्षकाला कपडे उतरवण्यास भाग पाडले. नकार दिल्यावर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली. भीतीपोटी शिक्षकाने धमकीला बळी पडत कपडे काढले. त्यानंतर अभिषेक पांचाळने शिक्षकाला फोन करून त्यांचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हाट्सअपवर पाठवले. 2 लाख रुपये द्या, नाहीतर व्हिडिओ व्हायरल करून नोकरी धोक्यात टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
समाजात बदनामीच्या भीतीने शिक्षकाने काही रक्कम पाठवली. पांचाळने सिद्धांतच्या फोन पे खात्यावर 30 हजार आणि 7 जुलैला 70 हजार रुपये उकळले. 29 ऑगस्टला पुन्हा 1 लाखाची मागणी करत गावात येऊन धमकी दिली. शिक्षकाने हा प्रकार पुतण्याला सांगितल्यानंतर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.