धक्कादायक! विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींना कठडे नसतात.

विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींना कठडे नसतात.
पुणे,बारामती वार्तापत्र रिपोर्ट
विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडगाव काशिंबेग येथे ही घटना घडली असून या घटनेनंतर परिसरावर शोककळा पसरली आहे. हिरामण रामदास डोके (वय 45) असे मृत शेतकऱ्याचेनाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृत हिरामण डोके हे वडगाव काशिंबेग येथील माळीमळा येथे कुटुंबीयांसह राहत होते. रविवारी दुपारी पिकांना औषध फवारणीसाठी तसेच विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी ते पत्नीसह शेताकडे गेले. वीजपंप सुरु करताना पाय घसरून रामदास डोके विहिरीत पडले. मोटार ठेवण्यासाठी विहिरीत असलेल्या लोखंडी खांबावर हिरामण यांचे डोके आपटल्याने ते गंभीर जखमी झाले. ते पाण्यात बुडताना पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरात काम करत असलेले सुरेश तारू, बाळशिराम डोके, मारुती डोके, श्रीराम डोके हे मदतीसाठी धावून आले.
सुरेश तारू यांनी पाण्यात उडी मारून हिरामण यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी मंचर येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून हिरामण यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हिरामण डोके यांच्या मागे आई-वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरींना कठडे नसतात. तर काही विहिरीजवळ कमी जागा, झाडेझुडपे, दलदल, निसरडा भाग असतो. शेतकरी रात्री अपरात्री मोटार सुरू करण्यासाठी जातात तेव्हा असे अपघात घडतात. या परिसरात बिबट्यांचा जास्त वावर आहे. बिबटेसुद्धा विहिरीत पडून मृत झाल्याच्या अनेक घटना या परिसरात घडल्या आहेत. वेळेत मदत न मिळाल्याने जखमींना जीव गमवावा लागतो. अशाच पद्धतीने नदी पात्रात सुद्धा मोटार सुरू करण्यासाठी गेल्यावर शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. बागायती पट्टा आणि वर्षभर पाणी असल्याने शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी अशा पद्धतीने आपला जीव गमावत असल्याने विहिरींची रचना योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे.