क्राईम रिपोर्ट

बारामतीत ‘घर दाखवतो’ म्हणत दरोडा; चार आरोपी अटकेत, ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल परत!

चार आरोपी अटकेत; सोन्याचे दागिने, चांदीच्या अंगठ्या व रोकड न्यायालयीन प्रक्रियेनंतर मूळ मालकाच्या ताब्यात.

बारामतीत ‘घर दाखवतो’ म्हणत दरोडा; चार आरोपी अटकेत, ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल परत!

चार आरोपी अटकेत; सोन्याचे दागिने, चांदीच्या अंगठ्या व रोकड न्यायालयीन प्रक्रियेनंतर मूळ मालकाच्या ताब्यात.

बारामती वार्तापत्र

घर दाखविण्याच्या बहाण्याने बोलावून शस्त्राचा धाक दाखवत दागिने व रोकड लुटल्याच्या दरोड्याच्या गुन्ह्यात बारामती तालुका पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेला एकूण ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आला.

सुरज संजय गाडगे (वय २७, रा. वरचे गल्ली, धनगरवाडा, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी ४ मे २०२६ रोजी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. बारामतीतील पियाजो कंपनीच्या पाठीमागील रस्त्यावर हा प्रकार घडला होता.

फिर्यादीनुसार, घर दाखविण्याच्या बहाण्याने पाच अनोळखी व्यक्तींनी गाडगे यांना बोलावून घेतले. त्यानंतर डोक्याला व कपाळाला शस्त्र लावून धमकावत त्यांच्या अंगावरील दागिने व रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली.

या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं. २०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१०(२) तसेच आर्म्स ॲक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी रवी संजय माने (२५), श्रीकांत अर्जुन धुले (२६), अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे (२७) आणि अतुल मोहन भोलनेकर (२१) या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चांदीच्या अंगठ्या आणि रोकड असा ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त मुद्देमालाबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ ऑगस्ट २०२६ रोजी सोन्याचे दागिने व रोकड फिर्यादी सुरज गाडगे यांच्या ताब्यात देण्यात आली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सपोनि विक्रम पवार तसेच मुद्देमाल कारकून म.पो.हवा. भारती खंडागळे यांनी केली.

पोलिसांच्या तपासाला यश
दरोड्याचा तपास करून आरोपींना ताब्यात घेणे, चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तो मूळ मालकाला परत मिळवून देणे, या कारवाईमुळे बारामती तालुका पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

Back to top button