क्राईम रिपोर्टपुणे

धडाकेबाज अजित पवारांची धडाकेबाज कामगिरी… जाग्यावर एक घाव दोन तुकडे… पोलिसामुळे त्रस्त महिलेला मिळाला न्याय !

"अहो, कमिश्नर, हे बघा तुमचे पोलीस काय करताहेत, हे असं चालणार नाही" 

धडाकेबाज अजित पवारांची धडाकेबाज कामगिरी… जाग्यावर एक घाव दोन तुकडे… पोलिसामुळे त्रस्त महिलेला मिळाला न्याय !

“अहो, कमिश्नर, हे बघा तुमचे पोलीस काय करताहेत, हे असं चालणार नाही”

पुणे, बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धडाकेबाज स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. त्याचं झालं असं की, साप्ताहिक आढावा बैठकीसाठी अजितदादा शुक्रवारी पुणे कौन्सिल आवारात आले होते. नेमकं त्याचवेळी कौटुबिंक हिंसाचारामुळे पीडीत महिला थेट अजितदादांनाच भिडली आणि तिने आपली कर्मकहाणी दादांच्या कानावर घातली.

अजितदादांनी मग जागेवरून पुणे पोलिस आयुक्तांना हाक मारली, ”अहो पोलीस कमिशनर…, हे पाहा. आम्ही पोलिसांच्या चांगल्या कामाचं एकाबाजूनं कौतुक करतो, अन दुसरीकडं तुमचे पोलीस काय करतायेत?” संतापलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान भवनाच्या आवारात मोठ्याने हाक मारल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता धावतच पवार यांच्याकडे आले. तेव्हा ती पीडित तरूणी म्हणाली, ”साहेब, मला तुमच्याकडे एक तक्रार करायची आहे…”. पवार थबकले आणि ती संधी साधत त्या तरूणीने आपल्या हातातील निवेदन त्यांच्या हाती ठेवले. पवार त्या निवेदनावर नजर फिरवत असतानाच त्या तरूणीच्या तोंडून बाहेर पडत असलेली तिची व्यथा ऐकू लागले.

”साहेब, माझा नवरा आणि सासरे दोघंही पोलीस आहेत. पण मला माहेराहून पैसे आणायचा दबाव आणताहेत, मला मारहाण करताहेत. मी आता सासरी राहात नाही. मलाही लहान मुलगी आहे हो…”त्या तरूणीचे बोट धरलेली एक चिमुकली मुलगी आपल्या निष्पाप डोळ्यांनी पवार यांच्याकडे पाहात होती. तिच्याकडे कटाक्ष टाकत पवारांनी पोलीस आयुक्तांनाच खड्या आवाजात हाक मारली. गुप्ता यांनी ते निवेदन आपल्या हातात घेतले अन् ”मी चौकशी करतो साहेब,”असे नम्रपणाने सांगितले.

त्यावर अजितदादा पोलीस आयुक्तांना म्हणाले, ”चौकशी करा, त्याला चांगला दम द्या, असं चालणार नाही म्हणावं त्याला.”मग त्या तरूणीकडे वळून पवार म्हणाले, ”तू काय शिकली आहेस ?” ”मी बी. कॉम. झालीये, साहेब.” ”ठीक आहे, पाहातो” असे म्हणून पवार विधान भवनात निघून गेले आणि इकडे पोलीस आयुक्त कामाला लागले. त्यांनी लगेच चौकशी करून संबंधित पोलीस नाईक असलेल्या पतीसह सासरच्यांवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचार, मारहाण तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तरूणीचा पती पोलीस नाईक योगेश पुरूषोत्तम सवाने (32), सासरे पुरूषोत्तम भिमराव सवाने (69), सासू आशा पुरूषोत्तम सवाने (60), दीर प्रसाद पुरूषोत्तम सवाने (29), नणंद योगिता रत्नाकर बनसोडे (30, रा. सर्वरा. आउंडे, लोणावळा, ता. मावळ जि. पुणे) आणि दादा भिमराव सवाने (60, रा.तळेगाव) यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या निर्देशानुसार चुतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघ चवरे यांनी तक्रारीची दखल घेत हा गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर करित आहेत. संबंधित आरोपी पोलीस हा पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे, तर सासरे निवृत्त आहेत. त्यामुळे आता पुणे शहर पोलिसांनी हे प्रकरण ग्रामीणकडे पाठवलंय. पण यानिमित्ताने अजित पवारांच्या धडाकेबाज स्वभावाचा एका पीडीतेला न्याय मिळण्यात नक्कीच फायदा झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!