‘ नंदन ‘ वन करण्याचे नादात बारामतीतील स्थानिक नागरिकांना नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा चटका !
कर भरणाऱ्या नागरिकांना पाणी विकत मात्र संघाला पाणी मोफत !

‘ नंदन ‘ वन करण्याचे नादात बारामतीतील स्थानिक नागरिकांना नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा चटका !
कर भरणाऱ्या नागरिकांना पाणी विकत मात्र संघाला पाणी मोफत !
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करत फिरावे लागत आहे.
परंतु बारामती येथील धनदांडग्यांना मात्र जागेवर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. तो ही मोफत त्यातीलच एक उदाहरण म्हणजे बारामतीतील नंदन दुध यांना गेले किती तरी दिवसापासून दररोज सहा हजार लिटर पाणी मोफत देण्याचा कार्यक्रम बारामती नगर परिषदेने हाती घेतलेला दिसून येत आहे.
नंदन दुध हे जगाच्या कानाकोपऱ्यातून दूध गोळा करून त्यापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करून लाखो रुपयांची कमाई करत असताना आणि बारामती नगरपरिषदेला त्याचा काही फायदा नसताना बारामती नगरपालिकेच्या मालकीचे सर्व सामान्याच्या हक्काचे पाणी अशा प्रकारे मोफत देऊन बारामती नगरपरिषद काय हेतू साध्य करत आहे.
हे जनसामान्य लोकांना पडलेले एक कोडेच आहे. सर्व सामान्यांच्या कुठल्याही समारंभासाठी तसेच बारामतीमधील मोठमोठाल्या अपारमेंट मध्ये पाण्याची आवश्यकता भासल्यास भाड्याचा टँकर विकत घ्या असे बारामती नगर परिषदेकडून सांगण्यात येते. त्या टॅंकर ची किंमत साडेतीन ते चार हजार रुपये खाजगी पाणी सप्लायर ला द्यावी लागते.
परंतु नगरपालिकेच्या मालकीचा टँकर, नगरपालिकेचे मालकीचे पाणी फ्री मध्ये कोणाच्या परवानगीने नंदन दूध संघात दिले जात आहे. असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अशा कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे बारामतीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत नंदन दुधचे चेअरमन यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की याबाबत मी मॅनेजमेंट शी चर्चा करून बोलतो. त्याचबरोबर बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. पौर्णिमा तावरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, झालेल्या घटनेत सत्यता असून यापुढे अशा प्रकारची चूक होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.