नगरपरिषद गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत सुधारणा करावी ; इंदापूर कॉंग्रेसची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
नगरपरिषद गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत सुधारणा करावी ; इंदापूर कॉंग्रेसची मागणी
मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर प्रशासकीय भवन व नगरपरिषदेच्या नवीन इमारतीसमोर बांधून तयार झालेल्या छत्रपती संभाजीराजे शॉपिंग सेंटर मधील गाळ्यांची ई-लिलाव प्रक्रिया बुधवारी (दि.६) सुरू झाली आहे. परंतु सदरील ई-लिलाव प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी अशी मागणी इंदापूर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना शुक्रवारी देण्यात आले आहे.
सदरील निवेदनात म्हटले आहे की, लिलाव अर्जामधील परिशिष्ट ३ नुसार नमूद केलेल्या गाळ्यांचे भाडे दर महिन्यास ४३६० रुपये इतके ठेवण्यात आलं आहे. हे भाडे सद्य परिस्थितीपेक्षा अधिक असल्याने गाळे भाड्याचा फेरविचार करावा. गाळेधारकांकडून दर महिन्याला गाळ्याचे भाडे घेत असताना गाळ्याची वार्षिक घरपट्टी ही गाळेधारकांकडून घेऊ नये. ज्या ठिकाणी गाळे आहेत त्या ठिकाणी व्यवसाय विकसित होण्यासाठी किमान ५ वर्षे लागू शकतात त्या अनुषंगाने ई-लिलाव अर्जातील अनुक्रमांक १० मध्ये नमूद करण्यात आलेला करार हा ९ वर्षांऐवजी कमीत कमी १५ वर्षाचा करावा.
सदरील शॉपिंग सेंटर मधील ७० टक्के गाळे शहरातील लोकांसाठी व ३० टक्के तालुक्यातील लोकांसाठी असे वर्गीकरण करावे.तसेच तालुक्याबाहेरील लोकांना गाळा देऊ नये. ई-लिलाव अर्जातील अनुक्रमांक १ नुसार प्रत्येक गाळ्याला बोली लावण्यासाठी ठरवण्यात आलेला २० हजार रुपये धनाकर्ष शिथिल करून एकाच धनाकर्षावर इतर गाळ्यांची बोली लावण्याकरिता अनुमती द्यावी. व सदरच्या गाळ्यांपुढे कसल्याही पध्दतीने अतिक्रमण होणार नाही याची लेखी हमी नगरपालिकेने गाळेधारकांना देऊन सदरील गाळे हे इंदापूरकरांची,इंदापूर नगरपरिषदेची मालमत्ता आहे.त्यामुळे त्याकडे नफेखोरीने न बघता गरीब होतकरू व गरजूंना फायदा होण्याच्या दृष्टीने बदल करावेत.
यावेळी तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत,काँगेसचे जिल्हा सरचिटणीस जकीरभाई काझी,तालुका सचिव महादेव लोंढे,अमर लेंडवे उपस्थित होते.