राजकीय

नवनिर्वाचित नगरसेविका 21 वर्षीय संघमित्राचा झंझावात :बारामतीत हत्तीवरून विजयी मिरवणूक

“मी कुणासाठी काम करते आहे, हे लोकांना प्रामाणिकपणे सांगितले आणि त्यांचाच विश्वास माझा विजय ठरला,”

नवनिर्वाचित नगरसेविका 21 वर्षीय संघमित्राचा झंझावात :बारामतीत हत्तीवरून विजयी मिरवणूक

“मी कुणासाठी काम करते आहे, हे लोकांना प्रामाणिकपणे सांगितले आणि त्यांचाच विश्वास माझा विजय ठरला,”

बारामती वार्तापत्र

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मतदारसंघ आणि शहरे ही विशिष्ट नेत्यांची किंवा कुटुंबांची अभेद्य गढी म्हणून ओळखली जातात. गेल्या अनेक दशकांपासून बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवार असोत किंवा अजित पवार, निवडणूक कोणतीही असो, बारामतीत पवारांचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चित्र बदलू लागले आणि काका-पुतण्यांच्या संघर्षात बारामतीचे राजकारण अधिक चुरशीचे झाले.

विधानसभा, लोकसभा निवडणुकांनंतर नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी गटांसाठी ही प्रतिष्ठेची लढत होती. अजित पवार सत्तेत असल्याने त्यांचा गट वरचढ ठरेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र या सगळ्या गणितांना छेद देत बहुजन समाज पक्षाच्या 21 वर्षीय संघमित्रा काळुराम चौधरी यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून दणदणीत विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या निकालामुळे बारामतीत बसपाचा झेंडा घराघरात पोहोचला असून पवारांच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच गंभीर धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. विजयानंतर संघमित्राची हत्तीवरून काढलेली मिरवणूक ही केवळ जल्लोष नव्हे, तर प्रस्थापित राजकारणाला दिलेले आव्हान मानले जात आहे.

संघमित्राची राजकारणात एन्ट्री कशी झाली?

संघमित्रा चौधरी ही अवघ्या 21-22 वर्षांची तरुणी आहे. सध्या ती कायद्याचे शिक्षण घेत असून, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी काम करणे हेच तिचे ध्येय आहे. ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दरीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होत असताना, हाच भेदभाव बारामतीसारख्या विकसित शहरातही अनुभवायला मिळतो, ही जाणीव तिला राजकारणाकडे घेऊन आली.

संघमित्राचे वडील काळुराम चौधरी हे गेल्या तीन दशकांपासून फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत. त्यामुळे सामाजिक प्रश्न, संघर्ष आणि संघटन यांचे धडे तिला लहानपणापासून मिळाले. त्यामुळे राजकारणात उतरणे तिच्यासाठी अचानक घेतलेला निर्णय नसून, चळवळीच्या विचारातून आलेले पाऊल आहे.

प्रस्थापित नेत्यांविरोधात थेट लढत
बारामतीच्या आमराई परिसरातून प्रभाग क्रमांक 14 मधून संघमित्रा निवडणुकीच्या रिंगणात उतरली. समोर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी गटांचे उमेदवार होते. अशा प्रस्थापित राजकीय ताकदीसमोर उभे राहणे सोपे नव्हते. मात्र संघमित्राने प्रचारात लोकांशी थेट संवाद साधला.
वंचित वर्गातील लोकांना ‘तुमच्यासाठी नेमकं काय करणार आहे’ हे तिने स्पष्ट शब्दांत सांगितले. विशेषतः आमराई परिसरातील झोपडपट्टी, पाणी, गटार, शिक्षण आणि भेदभाव या प्रश्नांना तिने प्रचाराचा केंद्रबिंदू बनवले. ही लढाई केवळ निवडणुकीपुरती नसून, अस्तित्व आणि सन्मानासाठीची आहे, हे तिने मतदारांच्या मनावर ठसवले. परिणामी मतदारांनी तिला भक्कम साथ दिली.

बारामतीतील दोन वास्तव : विकास आणि उपेक्षा

संघमित्राच्या मते, बारामतीत दोन वेगवेगळ्या जगांचे दर्शन होते. एकीकडे अतिशय स्वच्छ, सुंदर आणि विकसित बारामती आहे, तर दुसरीकडे आमराईसारख्या परिसरातील वंचित वर्गाच्या हालअपेष्टा आहेत. आमराई परिसराला अनेकदा बदनाम केले जाते आणि येथील लोकांबद्दल नकारात्मक प्रतिमा पसरवली जाते.
बँकांमध्ये कर्ज मिळण्यात अडचणी, पोलीस स्टेशनमध्ये भेदभावाची वागणूक, समाजावर लावलेला गुन्हेगारीचा शिक्का — या सगळ्या समस्या आजही कायम आहेत. शिक्षणाचा अभाव हे या सगळ्याचे मूळ कारण असल्याचे संघमित्रा सांगते. त्यामुळे आपल्या प्रभागात शिक्षणाचा दर्जा वाढवणे, सीबीएसई पॅटर्न सुरू करणे, तसेच पाणी आणि गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणे, हे तिचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

शिक्षण, कायदा आणि प्रतिनिधित्व
संघमित्राचे प्राथमिक शिक्षण बारामतीतच झाले, तर उच्च शिक्षण पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले आहे. सध्या ती भारती विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहे. कायद्याच्या माध्यमातून वंचितांसाठी लढायचे स्वप्न असले तरी प्रत्यक्ष बदल घडवायचा असेल, तर थेट लोकप्रतिनिधी होणे गरजेचे आहे, हे तिला उमगले. म्हणूनच तिने नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

वडिलांचा चळवळीतील अनुभव आणि लोकांशी असलेला विश्वास याचा तिला मोठा आधार मिळाला. “मी कुणासाठी काम करते आहे, हे लोकांना प्रामाणिकपणे सांगितले आणि त्यांचाच विश्वास माझा विजय ठरला,” असे ती सांगते.
पवारांच्या बारामतीत बसपाचा विजय : राजकीय अर्थ
बारामतीत बहुजन समाज पक्षाचा उमेदवार निवडून येणे याला केवळ स्थानिक नव्हे, तर राज्यपातळीवरही महत्त्व आहे. गेल्या अनेक दशकांपासून पवार कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या शहरात बसपाचा विजय म्हणजे वंचित वर्गाच्या असंतोषाचा स्पष्ट संदेश आहे, असे संघमित्रा सांगते.

फुले-शाहू-आंबेडकरांची नावे घेणारे प्रस्थापित नेते आमराई परिसराकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप ती करते. “संपूर्ण बारामती एकीकडे आणि आमराई दुसरीकडे, असे वास्तव आहे. हे बदलण्यासाठीच मी निवडून आले आहे,” असे तिचे ठाम मत आहे.

झोपडपट्टीमुक्त प्रभागाचे स्वप्न
प्रभागातील घरांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. बहुजन समाज पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेल्या ‘झोपडपट्टीमुक्त प्रभाग’ या आश्वासनानुसार लोकांना चांगली घरे मिळावीत, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे संघमित्रा सांगते.

निधीचा प्रश्न आणि मिश्किल उत्तर
“तू राष्ट्रवादीविरोधात निवडणूक लढवलीस. अजित पवार यांनी निधी दिला नाही तर काय?” असा प्रश्न विचारल्यावर संघमित्रा हसत उत्तर देते. “माझे वडील नेहमी सांगतात, अजित पवार हे माझे जेष्ठ बंधू आहेत. त्यामुळे काका निधी देणार नाहीत, असे होणार नाही,” असे मिश्किल उत्तर देत ती आत्मविश्वासाने पुढील वाटचालीची तयारी दर्शवते.

Back to top button