नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच धक्कादायक घटना ,वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी,तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू
14 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच धक्कादायक घटना ,वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी,तब्बल 12 जणांचा या चेंगराचेंगरीत मृत्यू
14 भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
प्रतिनिधी
नववर्षाचे तांबडे फुटल्यावर जम्मूमधील कटरा येथे माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 14 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अजूनही मदतकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे माता वैष्णोदेवी यांच्या यात्रेवर बंदी होती. कोरोना निवळल्यानंतर यात्रा आयोजनाचे आदेश दिले. मात्र, इथेच घात झाला आणि नववर्षाच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
अशी झाली चेंगराचेंगरी
जम्मूमधील कटरा येथील मंदिरात रात्री पावणेतीनच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली. आपल्या नववर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने व्हावी, यासाठी संध्याकाळपासूनच येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. मात्र, सध्या कोरोनाचे निर्बंध लागू असताना इतके जण इथे कसे काय जमले, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिर परिसरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. यावेळी त्यांच्यात आपापसात वाद झाले. त्याचे पर्यवसन धक्का-बुक्कीत झाले आणि पाहता-पाहता एकच गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी सुरू झाली.
प्रत्यक्षदर्शी म्हणतो…
गाजियाबाद येथील एका प्रत्यक्षदर्शीने असे सांगितले की, माता वैष्णोदेवीचे दर्शन केल्यानंतर काही नागरिक तिथेच थांबले. तिथे दर्शनासाठी मागून येणारे नागरिकही जमले. त्यामुळे एक मोठा जमाव एकाच ठिकाणी जमला. लोकांना बाहेर पडणेही मुश्किल झाले. अतिशय लहान जागेत जास्त लोक. हे दृश्य अंगावर काटे आणणारे होते. या दुर्घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शीच्या आप्तेष्टाचा मृत्यू झाला, तर एकाचा हात फ्रॅक्चर झाला.
पोलीस अधिकारी म्हणतात…
जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांच्या म्हणण्यानुसार, माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला. 13 जण जखमी झालेत. ही घटना रात्री पावणेतीनच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांमध्ये सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर चेंगराचेंगरी सुरू झाल्याचे समजते. कटारा येथील आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. गोपाल दत्त यांनी सांगितले की, जखमींना नारायणा हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते. अजून अनेक जणांची माहिती मिळालेली नाही. बारा मृतांचे शवविच्छेदन केले जाईल.
पंतप्रधानांकडून शोक
वैष्णोदेवी येथील चेंगराचेंगरीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या वारसांना 2 लाख आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हा यांनी ही घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौकशी समितीची स्थापन केल्याची घोषणा त्यांनी केली. सोबतच मृतांच्या वारसांना 10 लाख आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.