नव्वद दिवसातच इंदापूरचा ‘पाटीलवाडा’ लुटला
रोख रक्कमेसह ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर इंदापूर शहराच्या हद्दीतील महात्मा फुले चौक या ठिकाणावरून सुमारे शंभर मीटरवर नव्वद दिवसांपूर्वीच चालू झालेले हॉटेल ‘पाटीलवाडा’ अज्ञात चोरट्यानी लुटले असून रोख रक्कमेसह ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची फिर्याद हॉटेल मालक सागर मोहन राऊत (रा.सावतामाळी नगर इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी की,रविवारी (दि.१२) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करून हॉटेलचे मालक सागर राऊत भाऊ अक्षय राऊत व मावस भाऊ राम बनसूडे यांच्यासह झोपी गेले. परंतु इंदापूर नगरपरिषदे जवळ हॉटेल चे बॅनर बनविण्यासाठी टाकले असल्याने हॉटेल मालक सागर राऊत हे रात्री २ वाजता त्या ठिकाणी ते पाहण्यासाठी गेले व तसेच सावतामाळी नगर येथे असणाऱ्या घरी जाऊन झोपले. सोमवारी (दि.१३) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हॉटेल वर असणारे अक्षय राऊत यांनी सागर राऊत यांना फोन करून मावस भाऊ राम बनसुडे याचा मोबाईल रात्री घेऊन गेला आहेस का अशी विचारणा केली. त्यांनी नाही असे सांगितले.तद्नंतर हॉटेल मालक सागर राऊत यांनी लागलीच हॉटेलवर जाऊन हॉटेल च्या मोकळ्या जागेत शेडमध्ये असणारे काउंटर तपासले असता ते तुटलेले दिसले. ते उघडले असता त्यामधील ४८ हजार २५० रोख रक्कम तसेच रेबन कंपनीचा १३ हजार ८०० रुपये किंमतीचा गॉगल, विवो कंपनीचा ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ७० हजार ५० रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदशनाखाली हवालदार भारत जाधव करत आहेत.
सदरील हॉटेल ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी चोरट्यांनी तोडल्या आहेत. या हॉटेल चे उदघाट्न बरोबर तीन महिन्यांपूर्वी याचं तारखेला झाले होते.