
नायलॉन मांजा विक्रेत्यांवर इंदापूर पोलिसांची कारवाई
वीस हजार रुपयांचा मांजा जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
शुक्रवारी (दि.१३) इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठत नागपंचमी निमित्त सकाळी पासूनच पतंग,दोरा,वावडी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहवयास मिळाली.मात्र बंदी असणारा नायलॉन मांजा चोरून विक्रीसाठी ठेवल्याने पोलिसांनी वीस हजार रुपयांचा मांजा जप्त करून दोघां विक्रेत्यांवर विक्रम घळाप्पा जमादार व अमोल रामदास गारुडी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक वेळा विविध सामाजिक संघटनांकडून आणि पशुपक्षी प्रेमींकडून मांजा विक्रेत्यांवर कारवाईची मागणी केली जाते.पर्यावरण व पशु पक्षांच्या रक्षणासाठी तसेच नागरिकांना मांजामुळे होणाऱ्या दुखापती टाळण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ प्रमाणे खरेदी-विक्रीसाठी निर्बंध घातलेले असताना देखील विक्रेत्यांकडून नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा प्रकार इंदापूर शहरात समोर येत आहे.
मांजामुळे राज्यासह जिल्ह्यात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.दरवर्षी अनेक पशु-पक्षी या कारणाने मृत्युमुखी पडत असतात.त्यामुळे बंदी असणारा मांजा चोरून विक्री करणाऱ्या विशाल सूरज परदेशी ( वय ३१) व सुनील मधुकर इंगवले (वय ४७) या मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी भा.द.वि कलम १८८,३३६ तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम ५,१५ नुसार कारवाई केली आहे.
सदरील कारवाई इंदापूरचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मोहमद अली मड्डी,पोलीस नाईक रामदास जगताप,पोलीस शिपाई अमोल गारुडी,विक्रम जमादार,लिंगदेव नवले यांच्या पथकाने केली आहे.