निमगाव केतकीत दोन गटात मारामारी
परस्पर विरोधी गुन्हे दाखल

निमगाव केतकीत दोन गटात मारामारी
परस्पर विरोधी गुन्हे दाखल
इंदापूर प्रतिनिधी –
निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथील दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून झालेल्या मारामारीप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
यामध्ये शंकर भीमराव भोंग (वय 37, व्यवसाय शेती, रा. निमगाव केतकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि.14) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास निमगाव केतकी येथे इंदापूर रस्त्यावर जय कुदळे, दिनेश शेंडे,दादा भोंग, सूरज पिसे, ओंकार राऊत यांनी आदल्या दिवशी झालेल्या किरकोळ वादातून फिर्यादीची बुलेट मोटारसायकल (क्र. त्यांच्याकडील मोटारीने अडवली. त्यानंतर आरोपींनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी जय कुदळे याने त्याचे हातातील धारदारचाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटावर वार केले. त्यात बोट नखाजवळुन तुटून फॅक्चर झाले. त्याचवेळी दिनेश शेंडे याने फिर्यादीच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चेन काढून घेतली. तसेच, ‘पुन्हा आमच्या नादाला लागला तर तुला मारूनच टाकतो,’ अशी धमकी देऊन फरारी झाले. यावरून जय कुदळे, दिनेश शेंडे, दादा भोंग, सूरज पिसे व ओंकार राऊत (सर्व रा. निमगाव केतकी) यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
तसेच, दादासाहेब मधुकर भोंग (वय 27, व्यवसाय शेती, रा. निमगाव केतकी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास निमगाव केतकी येथील ‘डोंगरे कॉम्प्लेक्स’समोर गावातीलच शंकर भोंग, स्वप्नील भोंग, शक्ती बारवकर, स्वप्नील बारवकर, अमोल भोंग, आशितोष भोंग यांनी रात्रीच्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीसह त्याचे मित्र जय कुदळे व दिनेश शेंडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, शंकर भोंग याने त्याच्याकडील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताचे अंगठ्याजवळील बोटावर मारहाण करून दुखापत करीत डाव्या हाताच्या बोटातील एक तोळ्याची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. तसेच, दिनेश शेंडे याचे पृष्ठभागावरील उजव्या बाजूला चाकू मारून किरकोळ दुखापत केली. यावरून शंकर भोंग, स्वप्नील भोंग, शक्ती बारवकर, स्वप्नील बारवकर, अमोल भोंग, आशुतोष भोंग (सर्व रा. निमगाव केतकी) यांच्या विरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.