
निमगाव केतकी चोरीतील आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद
चाळीस हजारांची रोकड केली जप्त
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे निमगाव केतकी येथील अनिरुद्ध फुटवेअर दुकानाच्या गल्ल्या मधील ४० हजार रुपये चोरी झाल्याबाबत अनिरुद्ध भारत मोरे ( वय २१ वर्षे ) रा.निमगाव केतकी यांनी अज्ञात व्यक्ती विरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यात इंदापूर पोलिस यशस्वी झाले असून त्यांनी आरोपीला जेरबंद केले आहे.
सविस्तर हकीकत अशी की,रविवारी ( दि.७) रात्री ८ ते सोमवारी ( दि.८) सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान अनिरुद्ध भारत मोरे यांच्या फुटवेअर दुकानातील गल्यामध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेहल्या बाबत इंदापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३८०,४५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने सखोल तपास करून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अजय गणेश जठार रा.निमगाव केतकी या आरोपीस पोलिसांनी अटक करून चोरीस गेलेली ४० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
सदरील कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ए.डी खैरे, पोलीस नाईक आर.बी शिंदे यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास ए.डी खैरे करीत आहेत.