नीरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; सांगवी परिसरातील परिस्थिती गंभीर
प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

नीरा नदी प्रदूषणाच्या विळख्यात; सांगवी परिसरातील परिस्थिती गंभीर
प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
बारामती वार्तापत्र
सांगवी परिसरातून वाहणारी नीरा नदी सध्या तीव्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून त्यामुळे पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
फलटण येथील कत्तलखाना तसेच काही खाजगी डेअरी प्रकल्पांतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे नीरा नदीचे पाणी पूर्णतः दूषित झाले आहे.
या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका नदीतील जैवविविधतेला बसला असून मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मृत माशांचा सडा पडलेला असून पाण्याचा रंग वासाने आणि दिसण्यातही बदललेला आहे.
हिवाळ्याच्या सुरुवातीलाच नदीचे पाणी शेतीसाठी अयोग्य ठरल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
नीरा नदीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले असून ऊस, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच वाढती उत्पादनखर्च आणि अनिश्चित हवामान यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांपुढे आता पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे.
दरम्यान, नदीच्या दूषित पाण्यातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे सांगवी व आसपासच्या गावांतील नागरिक हैराण झाले आहेत.
विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या वेळेत दुर्गंधी अधिक तीव्र होत असल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दूषित पाण्यामुळे पाण्याद्वारे पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
त्वचारोग, पोटाचे विकार तसेच इतर संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे.
प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कत्तलखाने आणि डेअरी प्रकल्पांवर तातडीने कठोर कारवाई करावी, सांडपाण्याचे शुद्धीकरण बंधनकारक करावे तसेच नीरा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
वेळेत उपाययोजना न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला असून नीरा नदीचे अस्तित्व व परिसरातील जनजीवन वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






