परभणीतील घटनेच्या निषेधार्थ बारामतीत बंद
दुपारी बारापर्यंत व्यवहार बंद
बारामती वार्तापत्र
परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक शिल्पाकृतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ बारामती शहरात सोमवारी (दि. १६) बंद पाळण्यात आला.
व्यापारी वर्गानही या बंदला सहकार्य केले. परभरणीत असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली केलेल्या प्रकारातून तेथे न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू झाला. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी या वेळी आंबेडकरी संघटनांकडून करण्यात आली.
सोमवारी सकाळी शहरातील सिद्धार्थनगर भागातून निषेध व मूकमोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक, इंदापूर चौक, गुणवडी चौक, गांधी चौक, सुभाष चौकातून भिगवण चौक मार्गे मोर्चा नगरपरिषदेपुढे आला.
उद्योग भवनासमोर निषेध सभा पार पडली. या वेळी सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहत मोर्चाचा समारोप झाला. या वेळी विविध वक्त्यांनी परभरणीतील घटनेबद्दल चिंता व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केली. बारामती व्यापारी महासंघासह नागरिकांनी या बंदला सहकार्य केले. दुपारी बारापर्यंत व्यवहार बंद राहिले.