पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ,१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ,१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
मुंबई, प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला अटक करण्यात आली आहे. केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
यानंतर गोरेगाव पोलिसांकडून तिचा ताबा घेतला जाणार आहे. दरम्यान, केतकी चितळे हिच्याकडून जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.
ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ कडून केतकी चितळे हिची पोलीस कोठडीत कसून चौकशी करण्यात आली होती. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन तिचा लॅपटॉप आणि अन्य काही गोष्टीही ताब्यात घेतल्या होत्या. केतकी चितळेचा मोबाईलही पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल ठाणे गुन्हे शाखेला सोपवण्यात आला आहे. मात्र, या अहवालातील नेमका तपशील अद्याप समोर येऊ शकलेला नाही.
दरम्यान शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढल्या आहेत. ठाणे न्यायालयाने केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मुंबई पोलीस आता केतकीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांचं निवासस्थान सिल्व्हर ओकवरील हल्ल्यानंतर विविध गुन्ह्यांप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंवर महाराष्ट्रवारी करण्याची वेळ आली. आता तीच परिस्थिती केतकी चितळेवर ओढवण्याची शक्यता आहे. पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळेलाही विविध ठिकाणी दाखल गुन्ह्यांप्रकरणी राज्याचा दौरा करावा लागण्याची शक्यता आहे. केतकी चितळेविरोधात राज्यात जवळपास 15 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.
मी पोस्ट डिलीट करणार नाही, केतकीचा युक्तीवाद
केतकीनं कोर्टात युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिनं केला होता. केतकीनं सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की, मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, असंही तिनं कोर्टासमोर म्हटलं होतं.