पाच वर्षातच क-हा नदीवरील पूल गेला वाहून..स्थानिक लोकप्रतिनिधींना वेळ मिळेना
लोकांच्या घरांमध्ये शिरले पाणी

कऱ्हा नदीवरील पूल गेला वाहून;स्थानिक लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष
लोकांच्या घरांमध्ये शिरले पाणी
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील क-हा नदीच्या पात्रावर करावागज अंजनगाव रस्त्यावरील पूलाचे दोन्ही बाजूचे भराव मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहेत. भराव वाहून गेल्याने नदीने रौद्र रूप धारण करीत आपला मार्ग बदलला आणि आजूबाजूच्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याला जलसमाधी मिळाली.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदार संघातील नुकसानीचा आढावा घेतला. मात्र, बारामतीतल्या नुकसानीची आठवण त्यांना झाली नसावी, असा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी यांच्यावर निशाणा साधला. पूल वाहून गेल्याने अंजनगाव, जळगाव सुपे, सोनवडी सुपे आणि उंडवडी रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व नागरिकांचा संपर्क तुटला आहे. बुधवारी रात्री सलग चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे कऱ्हा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे अनेक छोटे मोठे पूल खचले आहेत. जिरायती भागात पाऊस झाल्याने क-हा नदीवरील अंजनगाव बंधाऱ्यात पाणी साठा वाढला मात्र बंधाऱ्याचे ढापे काढले नसल्याने बंधाऱ्याचे भराव फोडून पाण्याने वाट काढली, त्यामुळे बंधारा लगत असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला जोरदार वेगाने पाणी धडकून या पुलाचे भराव वाहून गेले आहेत. दरम्यान अंजनगाव कडे जाणाऱ्या सर्व वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे. अंजनगाव परिसरात जाणारी वाहतुक इतरत्र वळविण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, नगरसेवक सचिन सातव यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी करून आढावा घेतला दरम्यान बंधाऱ्याच्या ढापे वेळेत काढले नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.