बारामती:वार्तापत्र शाळेतील विद्यार्थ्यांना पार्किंग चा धोका होत असताना पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे
शहरातील सिध्देश्वर गल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांना येथे होणाऱ्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या संदर्भात पोलिसांना वारंवार पत्र देऊनही या गाड्यांवर काहीही कारवाई होत नसल्याने पालकही वैतागून गेले आहेत.
या ठिकाणी नगरपालिकेच्या तीन शाळा आहेत. या शाळेत मिळून पाचशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेसमोरील रस्ता हा चार चाकी वाहने पार्किंग करण्याची जागा होऊन बसल्याने शाळातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनाही त्याचा त्रास होतो. तासनतास लोक गाड्या य़ेथे पार्किंग करुन जातात.
या संदर्भात शाळांच्या मुख्याध्यापकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित वाहनचालकांवर कारवाईच केली जात नाही. शाळांच्या दारातच वाहने लावल्याने मुलांना शाळेत जाणेही अनेकदा अवघड होऊन बसते. चार चाकी गाडी मागे घेताना अपघाताचा येथे धोका आहे. विद्यार्थी येथे खेळत असतात त्यांनाही या गाड्यांपासून धोका होऊ शकतो.
या बाबी विचारात घेता येथील पार्किंग बंद करावे, अशी संबंधितांची मागणी आहे. पोलिसांकडून या ठिकाणी पार्क होणा-या गाडीचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.