पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात बारामती शहर चकाचक.
नगरपरिषदेने यंदा स्वच्छता, नियोजन आणि व्यवस्थापनाचा नवा आदर्श

पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात बारामती शहर चकाचक.
नगरपरिषदेने यंदा स्वच्छता, नियोजन आणि व्यवस्थापनाचा नवा आदर्श
बारामती वार्तापत्र
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेने यंदा स्वच्छता, नियोजन आणि व्यवस्थापनाचा नवा आदर्श निर्माण केला. पालखी सोहळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते, दिंडी मुक्कामस्थळे, सार्वजनिक ठिकाणे आणि पालखी मार्गावरील संपूर्ण परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, यंदा प्रथमच नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.
पालखी शहरात दाखल झाल्यानंतर तसेच शारदा प्रांगण येथे मुक्कामी आल्यानंतर नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि अधिकारी वर्ग यांनी गांधी चौक ते गुणवडी चौक या परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता कामात सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीमुळे सफाई कर्मचारी आणि अधिकारी यांना मोठे प्रोत्साहन मिळाले आणि संपूर्ण यंत्रणा अधिक जोमाने कामाला लागली.
पालखी मुक्कामासाठी शारदा प्रांगणात पोहोचल्यानंतर नागवडे वस्ती-देशमुख चौक-शारदा प्रांगण हा संपूर्ण पालखी मार्ग अवघ्या एका तासाच्या आत स्वच्छ करण्यात आला. तसेच आज सकाळी पालखीच्या प्रस्थानानंतर शहरातील मुख्य रस्ते, मैदान परिसर, मुक्कामस्थळे आणि पालखी मार्गावरील सर्व भाग पुन्हा केवळ एका तासाच्या आत स्वच्छ करून शहर पूर्ववत करण्यात आले.
या कामासाठी नगरपरिषदेचे सुमारे ४५० सफाई मित्र, १८ मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे पालखी सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतरही बारामती शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यात यश आले.
बारामती शहरातून पालखीचे आगमन आणि प्रस्थान या दोन्ही टप्प्यांमध्ये नगरपरिषदेने केलेले नियोजन, स्वच्छता आणि व्यवस्थापन यामुळे वारकरी, भाविक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बारामतीच्या स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या परंपरेला साजेसे काम यंदाही नगरपरिषदेने करून दाखवले आहे.






