
पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध
इंदापूर मतदार संघातून निवड
इंदापूर: प्रतिनिधी
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२१-२६ च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रतिष्ठेच्या इंदापूर ‘अ ‘ मतदार संघ तालुका प्रतिनिधी या मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब नानासाहेब जगदाळे यांची चौथ्यांदा संचालकपदी बुधवारी (दि.२२) बिनविरोध निवड झाली.
आप्पासाहेब जगदाळे हे सुमारे वीस वर्ष इंदापूर तालुका सोसायटी अ मतदारसंघातून बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत.बुधवारी (दि.२२) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अप्पासाहेब जगदाळे यांचाच एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची पुन्हा संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या बिनविरोध निवडीबद्दल पुणे येथे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अप्पासाहेब जगदाळे यांचे अभिनंदन केले. यावेळी उदयसिंह पाटील, रमेश खांदवे, अमरसिंह पाटील, संदीप निंबाळकर, संजय उभे, सुनीलमामा झांबरे, संतोष गलांडे आदी उपस्थित होते.