पुणे जिल्ह्याच्या पालकत्वाची माळ कोणत्या दादाच्या गळ्यात? दोन नेत्यांमध्ये चुरस
दोघांनाही राजकीय वर्तुळात दादा म्हणून ओळखलं जात
पुणे जिल्ह्याच्या पालकत्वाची माळ कोणत्या दादाच्या गळ्यात? दोन नेत्यांमध्ये चुरस
दोघांनाही राजकीय वर्तुळात दादा म्हणून ओळखलं जात
बारामती वार्तापत्र
महायुतीच्या खातेवाटपानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे ती म्हणजे पालकमंत्रीपदाची. ठाणे, पुणे, रायगड, संभाजीनगरचं पालकत्व नेमकं कोणाकडे असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाच जिल्ह्यात अनेकांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडल्यामुळं महायुतीत पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
अशातच पुण्याच्या पालकमंत्रीपदाची माळ कोणत्या दादाच्या गळ्यात? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पुण्याचं पालकमंत्रीपद हे अजित पवार यांना मिळणार की चंद्रकांत पाटील यांना असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोघांनाही राजकीय वर्तुळात दादा म्हणून ओळखलं जात. त्यामुळं राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी कोणाला देणार? याची उत्सुकता लागली आहे.
रविवारी पुण्याच्या पालकमंत्रीपदासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील आमदारांच्या संख्येवर ठरत नाही तर अनुभवावरून ठरते, असे स्पष्टपणे सांगत पक्ष घेईल तो निर्णय मान्य असल्याचे चंद्रकांत पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले होते. लवकरच पालकमंत्रिपदे जाहीर करण्यात येतील. सातारा जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात चार मंत्री आहेत. त्या प्रमाणात कुणाला पालकमंत्री द्यायचं ह्या सोप्या गोष्टी नाहीयेत, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले होते.
मात्र, अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात कोणतही भाष्य केलेलं नाही. परंतु राजकीय वर्तुळात, चंद्रकांत पाटील हे केंद्रीय मंत्री अमित शाहा यांचे निकटवर्तीय असल्याने पाटील पालकमंत्रीसंदर्भात आग्रही असल्याची चर्चा सुरु आहे.
अशातच, पुण्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाटील असे मंत्री लाभले आहेत. दोन दिवसांपूर्वी माधुरी मिसाळ यांनी पालकमंत्रीपदावरुन मोठं वक्तव्य केलं होतं.
पुण्याचे पालकमंत्री कोणतेही दादा झाले तरी मला आनंदच आहे. मी दोन्ही दादांचं काम पाहिलं आहे. दोन्ही दादांनी नेहमी मला मदत केली, असं वक्तव्य माधुरी मिसाळ यांनी केलं आहे.
तर मोहोळ यांनी यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना, तुम्ही कशीही गुगली टाकली तरी मी सावध आहे. यॉर्कर टाका, गुगली टाका मी पण आता चांगला बॅट्समन होत चाललो आहे. खातेवाटप एकमताने झाले आहे, आता ज्या -त्या जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवताना एकमताने होतील. याबाबत कोणतीही शंका माझ्या मनात नाही, तुम्हीसुद्धा ठेवू नका, असं भाष्य केलं.
बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर चंद्रकांत पाटील कोथरूड मतदारसंघामधून विजयी झाले.
खाते वाटपादरम्यान दोघांकडेही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यात आलं आहे.
तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खाते कायम ठेवण्यात आलं.
गतवेळी म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सत्तेदरम्यान, पुण्याचे पालकमंत्रीपद आधी चंद्रकांच पाटलांकडे होते,
मात्र जेव्हा अजित पवार महायुतीत सामील झाले तेव्हा पुन्हा पुण्याचं पालकमंत्री पद हे अजित पवारांकडे देण्यात आलं होतं आणि सोलापुरचं पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटलांकडे गेलं होतं. त्यामुळं पुण्याच्या पालकत्वाची जबाबदारी पवारांकडेच राहणार की पाटलांना देण्यात या गोष्टीची वाट पाहावी लागणार आहे.