राजकीय

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार; अनेक तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यामुळे बळकटी मिळाली आहे.

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार; अनेक तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकारी करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यामुळे बळकटी मिळाली आहे.

सोमेश्वरनगर;प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाआधीच जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत त्यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचा सफाया होणार असल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काँग्रेस पक्षाची मोठी ताकत होती. २०१४ च्या मोदी लाटेत ही जिल्ह्याने काँग्रेस पक्षाला ताकद दिली होती. माजी आमदार संजय जगताप व संग्राम थोपटे यांनी पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता. मात्र नवीन राजकीय समीकरणे घडल्याने संजय जगताप व संग्राम थोपटे या दोघांनी भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मानणारे जिल्हा काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांच्या अवस्था दोलायमान झाली होती. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला घरघर लागल्याचे चित्र होते.

जगताप व थोपटे भारतीय जनता पक्षात गेले तरी त्यांना मानणारे दोन्ही गट काँग्रेस पक्षात सक्रिय होते. संजय जगताप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही काँग्रेस पक्षात उघड दोन गट कार्यरत होते. नुकतीच श्रीरंग चव्हाण यांची पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र चव्हाण हे संग्राम थोपटे यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते. त्यामुळे संजय जगताप यांना मानणारा काँग्रेसमधील गट नाराज झाला असून पुणे जिल्हा काँग्रेस पक्षातील अनेक वरिष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचा प्रवेश होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बारामती लोकसभा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ, प्रदेश प्रतिनिधी निखिल कवीश्वर, जिल्हा सरचिटणीस पृथ्वीराज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अवधूत माने, जिल्हा युवक अध्यक्ष उमेश पवार, इंदापूर तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, बारामती तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव, आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू भाई इनामदार, हवेली तालुका अध्यक्ष सचिन बराटे, खडकवासला युवक अध्यक्ष सागर मारणे, खडकवासला विधानसभा अध्यक्ष उमेश कोकरे, दौंड विधानसभा अध्यक्ष विठ्ठलराव दोरगे यांसह अनेक पदाधिकारी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. बारामती तालुका काँग्रेस आय पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र राजेनिंबाळकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून पक्ष प्रवेशासाठी तारीख मागितली आहे. आगामी उर्वरित तालुकाध्यक्षही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला यामुळे मोठा फटका बसला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यामुळे बळकटी मिळाली आहे.

Back to top button