सन २०२०-२१ सुंदर गाव पुरस्कारात इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी प्रथम
१६ लाख रुपयांचे पटकावले बक्षीस

सन २०२०-२१ सुंदर गाव पुरस्कारात इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी प्रथम
१६ लाख रुपयांचे पटकावले बक्षीस
इंदापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत ग्रामविकास व गृहमंत्री आर.आर पाटील यांच्या नावाने दिला जाणारा स्मार्ट ग्राम योजनेचा आर.आर पाटील सुंदर गाव ( सन २०२०-२१ ) हा १६ लाख रुपये बक्षीसाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार निमगाव केतकी ला (ता.इंदापूर) मिळाला आहे. १६ फेब्रुवारी रोजी स्वर्गीय आर.आर पाटील च्या पुण्यतिथीनिमित्त निमगांव केतकी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाल्याने इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली.
सुंदर गाव पुरस्कार अंतर्गत निमगांव केतकी गावाची तपासणी इंदापूर पंचायत समितीच्या पथकाने करून त्याचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानंतर गावाला पुरस्कार जाहीर केला आहे. ग्रामपंचायत कार्यालय व ग्राम विकास अधिकारी लक्ष्मीकांत जगताप व सर्व आजी-माजी सदस्यांनी व कर्मचारी वर्गाने शासनाच्या आलेल्या अनेक योजना प्रभावीपणे राबवल्या तसेच योजनांची माहिती वेळोवेळी ग्रामस्थांना दिल्याने अनेक योजनांचा लाभ घेऊन विकास कामे वेळेत पूर्ण केल्याने निमगांव केतकी ला हा प्रथम क्रमांक मिळाला आहे.
दरम्यान गावाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने गावचे नूतन सरपंच प्रवीण डोंगरे,उपसरपंच सचिन चांदणे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी केला. तर ग्रामपंचायतीच्या वतीने परिट व जगताप यांचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कारातून मिळालेल्या सोळा लाख रुपयाच्या बक्षीसातून गावामध्ये अपारंपारिक ऊर्जा संबंधित अभिनव प्रकल्प, स्वच्छतेबाबत तसेच महिला सक्षमीकरण आणि मुलांना अनुकूल प्रकल्प, स्वच्छ पाणी वितरण, सौर पथदिवे, इंटरनेट वायफाय सिस्टीम बसवणे आदी गोष्टींना हा निधी वापरण्यात येणार आहे.