पुण्यातील लाल महालात लावणी प्रकरण.. वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.
पुण्यातील लाल महालात लावणी प्रकरण.. वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे.
पुणे,प्रतिनिधी
पुण्यातील लाल महाल येथे एक महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेल्या लावणी प्रकरणी नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटीलसह तिघांवर फरासखाना पोलीस स्टेशन येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या फरासखानापोलीस ठाण्यात वैष्णवी विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 295 आणि 186 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीने 16 एप्रिल रोजी पुण्याच्या लाल महालात चंद्रमुखी या सिनेमातील चंद्रा गाण्यावर लावणी शूट केली होती. वैष्णवीने शूट केलेली लावणी गेली अनेक दिवस सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. परंतू तब्बल एक महिन्यानंतर वैष्णवीच्या लावणी रिलवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप नोंदवला. लाल महाल शूटसाठी बंद ठेवण्यात आला असताना लावणी शूट करण्यात आल्याने नृत्यांगना वैष्णवी पाटील सह कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सगळ्या प्रकरणावर वैष्णवीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. माफी मागत वैष्णवीने म्हटलेय, ‘पुण्याच्या लाल महालात व्हिडीओ शूट करताना माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते. गाणं सुंदर असल्याने त्यावर व्हिडीओ करावा असे माझ्या मनात आले. त्यामुळे मी त्यावर मी व्हिडीओ शूट केला. लाल महालात मी व्हिडीओ शूट केला ही माझ्याकडून चूक झाली आणि ती चूक मी मान्य करते. जितकेही शिवप्रेमी आहेत, जी जनता माझ्यावर प्रेम करते, माझ्या नृत्यावर प्रेम करते त्या सर्वांची मी माफी मागते’.
संभाजी ब्रिगेडची मागणी : पुण्यातील लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला असताना जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुलींना नाचवले जात आहे. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केल आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडने केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जितेंद्र आव्हाडांचे ट्विट : दरम्यान, याप्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिलीय. ‘पुण्यातला शिवाजी महाराजांचा लाल महाल हि वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे .. ह्यापुढे होता कामा नाही.. कोणी केले असेल तर वापरू नका’, असे ट्विट त्यांनी केले आहे.