पुर्ण वेळ अधिकारी नसल्याचा एसटीला फटका!
दोन्ही महत्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिल्याने ते वेळ देऊ शकले नाहीत.

पुर्ण वेळ अधिकारी नसल्याचा एसटीला फटका!
दोन्ही महत्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिल्याने ते वेळ देऊ शकले नाहीत.
बारामती वार्तापत्र
एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असतानाच महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार अपर मुख प्रधान सचिव परिवहन यांच्याकडे तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे प्रशिक्षणासाठी गेल्याने त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार परिवहन आयुक्त यांच्याकडे गेल्याने व त्या दोघांनीही अपेक्षित वेळ न दिल्याने एसटीच्या दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला असून साहजिकच त्याचा फटका एसटीला बसला आहे.प्रवासी संख्या कमी होण्याचे ते एक मुख्य कारण असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रवाशी संख्येत वाढ व उत्पन्नात वाढ होण्यासाठी वरिष्ठांकडून विभागीय व आगार पातळीवर सतत दबाव राहिला पाहिजे. आढावा बैठका घेतल्या पाहिजेत.
मध्यंतरीच्या काळात एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी स्वतः काही जिल्ह्यात जाऊन आढावा बैठका घेतल्या व उदिष्ट ठरवून देण्यात आले.त्यातून काही प्रमाणात प्रगती दिसून आली व तोट्याचे प्रमाण कमी होऊन प्रतिदिन दोन कोटी रुपयांवर तोटा आला होता.
त्या नंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही काही आगारांना भेटी देऊन चांगली स्वच्छता करण्यास भाग पाडले.त्याचाही चांगला परिणाम दिसून आला.स्वच्छता, गाड्या वेळेवर सुटणे, जास्तीत जास्त संख्येने गाड्या मार्गावर जाणे हे उत्पन्न वाढीसाठी निश्चितच फायदेशीर ठरत असतानाच दोन्ही महत्वाच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे दिल्याने ते वेळ देऊ शकले नाहीत.
व सातत्य राखून ठेवण्यात अपयश आल्याने भाडेवाढी नंतरचे दैनंदिन उत्पन्न ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टाप्रमाणे चार कोटींच्यावर जायला हवे होते.पण ते गेले नाही.
मधल्या काळात प्रशासनाकडून काही चांगली परिपत्रके काढली गेली पण त्यातून काय फलनिष्पत्ती झाली याचा आढावा घेण्यात आला नाही. त्याच प्रमाणे उत्पन्न वाढीसाठी काही उदिष्ट ठरवून देऊन डिसेंबर महिन्यात प्रशासनाने परिपत्रक काढून “पंचसूत्री” जाहीर केली.व त्यात जानेवारी २५ ते मार्च २५ या कालावधीत उत्पन्न वाढ करण्यासाठी काही उपाययोजना घालून देण्यात आल्या.त्याला आता तीन महिने व्हायला आले तरी त्यातून आता पर्यंत काय फलनिष्पत्ती झाली ?यावर कुठल्याच स्थरावर आढावा बैठक झाली नसून वरिष्ठ अधिकारी नसल्याने खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्याच नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे पंचसूत्रीत ठरवून देण्यात आल्या प्रमाणे विद्यार्थी पास संख्या अत्यंत चांगली वाढली असून त्या मुळे १०० कोटींवर रुपये उत्पन्न मिळेल असे दिसत आहे.
स्वच्छते बाबतीत बोलायचे झाल्यास अजूनही काही आगारात स्वच्छतेची प्रगती म्हणावी तशी दिसत नाही.मार्गबंद गाड्यांचे प्रमाण मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.
ती सुध्या चांगली बाब आहे.पण ज्या उत्पन्न वाढीच्या उद्देशाने ही पंचसूत्री जाहीर करण्यात आली त्यात मात्र सफलता मिळालेली दिसत नाही. किंबहुना अपयश आले आहे.पंचसूत्रीला वजन प्राप्त करण्यासाठी परिपत्रकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून कमी मिळालेल्या उत्पन्नाला परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरायचे का? असा सवाल उपस्थित करून त्यांनी म्हटले आहे की,अचानक मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्येत घट झाल्याने मंत्र्यांचीही बदनामी होत असून त्यांनी आता स्वतः लक्ष घालून एसटीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा असेही बरगे यांनी म्हटले आहे.
चौकट:
तरुण अधिकारी नोकरी सोडून जातात …..
अनेक तरुण अधिकारी एसटी च्या भरती जाहिराती पाहून येतात परंतु शिक्षणाप्रमाणे पगार नाही,काही ठिकाणी शिक्षणाप्रमाणे नेमणूक नाही, कमी पगार जास्त जबाबदाऱ्या व अनुभव वाढला तरी अत्यल्प पगार वाढतो ,सेवा ,सुविधा नसतात त्यामुळे जेमतेम 5 वर्ष च्या आसपास एसटी ची नोकरी करतात इतर कंपन्या किंवा इतर शासकीय खात्यातील नोकरीची संधी आली की सोडून जाण्याचे प्रमाण मोठे आहे त्यामुळे अनेक आगारात, कार्यालयात, कार्यशाळेत अनेक अधिकारी यांची पदे रिक्त आहेत त्याचा परिणाम एसटीच्या कामगार व वार्षिक उत्पन्नावर सुद्धा होत असतो: