बारामतीत ट्रॅफिकचा बोजवारा; नागरिक त्रस्त
चौकामध्ये काही काळ हजेरी लावल्यानंतर वाहतूक पोलिस गायब होत आहेत.

बारामतीत ट्रॅफिकचा बोजवारा; नागरिक त्रस्त
चौकामध्ये काही काळ हजेरी लावल्यानंतर वाहतूक पोलिस गायब होत आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील गांधी चौक ते गुणवडी चौक या मुख्य बाजारपेठेत ट्रॅफिक नियंत्रणाचा अभाव असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे.
दुपारपासून सुरू झालेल्या या कोंडीत नो-एन्ट्री झोनमध्ये उलट दिशेने येणाऱ्या चारचाकी वाहनांमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. परिणामी,बाजारपेठेतून जाणाऱ्या पादचारी आणि दुचाकीस्वारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी शहरात स्वतःकडील कर्मचा-यांसाठी सुद्धा पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. त्यांच्याकडे काम करणा-या अनेक कर्मचा-यांच्या दुचाकी रस्त्यावर लागतात. त्यातून व्यापारपेठेत खरेदीसाठी येणा-या ग््रााहकांनी वाहने लावायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांनी मनाला वाटेल तेथे दुकाने थाटली आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. नगरपरिषद आणि पोलिस प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे.
शहरातील आणखी एक महत्त्वाचा रस्ता शिवाजी चौक ते मुख्य बसस्थानक मार्ग येथेही ट्रॅफिक नियंत्रणाचा पूर्ण अभाव असल्याने वाहतुकीच्या रांगा तासन्तास लागलेल्या दिसून आल्या. नागरिकांच्या मते, या भागात वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहनचालक मनमानी पद्धतीने वाहने चालवतात.
स्थानिक नागरिकांमध्ये याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून,आताच बदली झालेले वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे रस्त्यावर स्वतः उतरून बारामतीतील ट्रॅफिकच्या समस्येला मार्ग काढत होते. परंतु आता नवीन रुजू झालेले अधिकारी मात्र “फक्त कार्यालयात बसून सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणारे अधिकारी गरजेचे आहेत,”अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
नागरिकांचा प्रश्न आहे की,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणार का? तसेच “ट्रॅफिकमुक्त बारामती” करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






