निमगावकरांनो विकासाच्या बाबतीत निर्धास्त राहा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पाणी प्रश्न मार्गी लावण्याची दिली ग्वाही

निमगावकरांनो विकासाच्या बाबतीत निर्धास्त राहा : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पाणी प्रश्न मार्गी लावण्याची दिली ग्वाही
इंदापूर : प्रतिनिधी
विकास कामांबद्दल निमगावकरांनी सांगावं असं काही नाही, द्यायची वेळ येईल तेव्हा निमगाव केतकी वर आपोआप टिकमार्क होईल त्यामुळे निमगावकरांनो विकासाच्या बाबतीत निर्धास्त राहा अशी ग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली.शनिवारी (दि.२०) निमगाव केतकी येथील ५ कोटी ५७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नामदार भरणेंच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.
इंदापूर तालुक्यासाठी खूप मोठा निधी येत आहे. मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे आनंद आहे. २००९ , २०१४ व २०१९ या माझ्या सुख-दुःखाच्या काळात इंदापूर तालुक्यातील कोणत्या गावांनी मला साथ दिली असेल तर ती निमगावकरांनी दिली. त्यामुळे निमगावकरांचे उपकार निमगावकरांचं ओझं हे माझ्यावर असल्याने निमगावकरांना एकच सांगायचंय तुमच्या व गावाच्या विकासासाठी जे-जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न भविष्यात राहणार आहे. विकास तर करणारच आहे परंतु प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा,थोडा उशीर होईल पण निमगाव आणि परिसरामध्ये हक्काचं शेतीचं पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्न सुरू आहे. काम करतो म्हणजे उपकार नाहीत. ज्या भावनेनं,विश्वासानं जनतेनं मला खुर्चीवर बसवलं आहे त्यामुळे ते माझं कर्तव्यच आहे.
●पाठीमागे १९ वर्ष खुर्चीवर असताना कोणी काय केलं माहीत नाही. त्यावर काय म्हणायचं ही नाही.परंतु आत्ता आपणास सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं आहे.असा टोला नाव न घेता राज्यमंत्री भरणेंनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना लगावला.●
महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवणार
महिला भगिनींच्या डोक्यावरील हंडा उतरवून निमगावकरांच्या प्रत्येक घरात नळ कनेक्शन द्यायचं आहे. त्यासाठी प्राथमिक आराखडा तयार केला असून त्यासाठी चा आकडा आठ कोटींचा झाला आहे. निमगावकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आठ-दहा काय पंधरा कोटी दिले जातील त्याची अजिबात काळजी करू नका.उजनी वरून काय करता येते का बघू माझ्या डोक्यात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पैशाची अजिबात काळजी करू नका मामाच्या रक्तातच काम आहे असं राज्यमंत्री भरणेंनी यावेळी नमूद केलं.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ,मा. जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ डोंगरे, सरपंच प्रवीण डोंगरे,उपसरपंच सचिन चांदणे,ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वडापुरे,अतुल मिसाळ,बाबासाहेब भोंग,मच्छिंद्र चांदणे,ॲड.सचिन राऊत,रवी शेंडे व इतर ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांकडून करण्यात आला.