क्राईम रिपोर्ट

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला अन् कोयत्याने हल्ला, आरोपी अटक..

वर्षभर फरार असलेला सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारला अन् कोयत्याने हल्ला, आरोपी अटक..

वर्षभर फरार असलेला सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बारामती वार्तापत्र

विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडे व कोयत्याने प्राणघातक हल्ला करणारा, तब्बल एक वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर बारामती तालुका पोलिसांनी अटक केला आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या आरोपींचे धाबे दणाणले आहेत.
दि.१५ जानेवारी रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेला असता, आरोपींनी त्याच्यावर हातातील लोखंडी कडे व लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस कलम ११८(२), ११५(२), ७४, ७५, ७८ तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणधरे, ता. बारामती, जि. पुणे) हा गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे दि.१९ रोजी एमआयडीसी परिसरातून आरोपीस अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या.
धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही भिगवण पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे व बारामती शहर पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस त्याचा कसून शोध घेत होते.
ही कारवाई संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक आणि सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत कल्याण शिंगाडे आणि पोलीस अमलदार मनोज पवार सुरेंद्र वाघ भारत खारतोडे दादा दराडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करत असून,न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या कारवाईमुळे महिलांवरील अत्याचार व गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात पोलिसांची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Back to top button