बहीण भावाच्या अबोल्याची चर्चा;अजितदादा-सुप्रिया सुळे बारामती एकाच मंचावर, बोलणं तर लांब…
एकमेकांकडे बघितलं पण नाही!

बहीण भावाच्या अबोल्याची चर्चा;अजितदादा-सुप्रिया सुळे बारामती एकाच मंचावर, बोलणं तर लांब…
एकमेकांकडे बघितलं पण नाही!
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर फार कमी वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एका मंचावर आल्या. परंतु शनिवारी एकत्र येण्याचा योग येऊनही दोघांनी ना एकमेकांकडे पाहिले, ना एकमेकांशी बोलले…
बहीण भावाच्या अबोल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होतीच शिवाय बारामतीत देखील या प्रसंगाची मोठी चर्चा रंगली.
बारामतीच्या अंजनगावात केवी उपकेंद्र आणि राजे उमाजी नाईक यांच्या नावाने बनविलेल्या सभागृहाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली.
अजितदादांच्या आगमनाआधी सुप्रिया सुळे कार्यक्रमस्थळी पण ना संवाद ना नजरानजर
अजित पवार यांचे आगमन व्हायच्या आधी सुप्रिया सुळे कार्यक्रमस्थळी आलेल्या होत्या. पुढच्या काही मिनिटांत अजित पवार यांचे आगमन झाले. सुप्रिया सुळे यांच्यासह त्यांच्या बरोबर असलेल्या लोकांकडे पाहून अजित पवार यांनी नमस्कार केला. त्यानंतर केवी उपकेंद्र आणि सभागृहाचे उद्घाटनही त्यांनी केले. जवळपास अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात बहीण भावाने एकमेकांकडे पाहिलेही नाही.
नजरानजरही टाळली
अजित पवार कार्यक्रमात अधून मधून अधिकाऱ्यांच्याकडून उपकेंद्राबाबतची माहिती घेत होते. अधिकाऱ्यांना सूचना करीत होते. भेटायला आलेल्या नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करीत होते. परंतु यासमयी उपस्थित असलेल्या खासदार सुळे यांच्याशी मात्र त्यांनी बोलणे टाळले. एका प्रसंगी तर फोटोसाठी अगदी एकाच फ्रेममध्ये आल्यानंतरही त्यांनी नजरानजरही टाळली.
राजकारण लै वाईट, उपस्थित लोक खंत व्यक्त करीत होते
पक्षात फूट पडण्याआधी सुप्रिया सुळे आणि अजित पवार या भाऊ बहिणीच्या नात्याचे उदाहरण राजकारणी मंडळी देत असत. सुप्रिया सुळेही अनेकदा अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचे जाहीर कौतुक करीत असत. दुसरीकडे अजित पवारही सुप्रिया सुळे यांच्या संसदेतील भाषणांचे तोंडभरून कौतुक करीत आणि अभिमानाने उपस्थितांना सांगत. परंतु पक्षफूट आणि त्यानंतर झालेल्या राजकारणाने भाऊ-बहिणीत आलेला दुरावा दुसऱ्यांदा पाहायला मिळाल्याची खंत उपस्थित लोक व्यक्त करीत होते.