बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे
संगीत कोकरे यांनी माळेगावचे संचालिक म्हणून 25 वर्ष जबाबदारी पेलली आहे.

बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे
संगीत कोकरे यांनी माळेगावचे संचालिक म्हणून 25 वर्ष जबाबदारी पेलली आहे.
बारामती वार्तापत्र
बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यापदी धुरा कोणाच्या हाती देण्यात आली हे स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांना संधी देण्यात आली आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अजितदादांनी अध्यक्षपद आपण स्वतःकडेच घेणार असल्याचे जाहीर केले होते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्ये लढत झाली. या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली. विरोधी पॅनलमधून केवळ चंद्रराव तावरे यांचा विजय झाला.
प्रचाराचा शुभारंभ करतानाच अजितदादांनी आपण स्वतः कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
माळेगाव कारखान्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी अजितदादांचा, तर उपाध्यक्षपदासाठी संगीता बाळासाहेब कोकरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी जाहीर केले.
त्यानंतर लगेचच आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. निवडीनंतर अजितदादांनी संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाची बैठक घेत कारखान्याच्या कामकाजाबाबत त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. येत्या पाच वर्षात आपल्याला कारखान्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यामुळे जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने काम करावं, कुणी चुकीचा वागल्यास आपण हयगय करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
माळेगाव कारखान्याच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज निवड करण्यात आली. निवडीनंतर अजितदादांनी संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत माळेगाव कारखान्याच्या पुढील पाच वर्षांच्या कामकामाजाबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी कारखान्याच्या संपूर्ण कामकाजाचाही आढावा घेतला. त्याचवेळी पुढील पाच वर्षात माळेगाव कारखान्याची वाटचाल कशी असेल याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
सभासदांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवत पुढील पाच वर्षात उच्चांकी ऊसदर देण्यावर आपला भर असणार आहे. त्याचवेळी कारखान्याचा चेहरामोहराही आपल्याला बदलायचा असून सहकारी साखर कारखाना आपण कसा चालवतो हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचे असल्याचे अजितदादांनी यावेळी सांगितले. प्रत्येक संचालक आणि अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागतानाच सभासदांना सन्मानाची वागणूक देण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.
कारखाना हा सभासदांच्या मालकीचा असून प्राधान्याने त्यांच्या हिताचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्याचवेळी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध राहिले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादनात वाढ करण्यावर आपला भर असेल, त्याचवेळी कारखान्यातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच अजितदादांनी आपल्या कामांचा धडाका सुरू केल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी कारखान्यात नवनवीन प्रयोग राबवण्याबाबतच्या संकल्पना मांडतानाच कुणीही चुकीचं वागल्यास त्याची हयगय केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले, कामगारांनीही संस्था आपलीच आहे असं समजून प्रामाणिकपणे काम करावं अशाही सूचना त्यांनी केल्या.
दुपारी तीन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. त्यानंतर अजितदादांनी सलग पाच तास संचालक मंडळ, अधिकारी वर्ग यांच्या बैठका घेत कारखान्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अधिकारी वर्गाशीही त्यांनी चर्चा करत माहिती घेतली. येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सर्व बाबी सुधारून उत्पादन वाढीवर भर दिला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
अजितदादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून केली होती.
‘माळेगाव’चे स्थापनेपासून आजपर्यंतचे चेअरमन
१) (कै) गणेश गोपाळ शेंबेकर उर्फ दादासाहेब (३१.८. १९५५)
२) दत्तात्रय गणेश शेंबेकर (१९५५-१९५९),
३) वीरसिंह चंद्रसेन जाधवराव (१८.५.१९६० – २७.१०.१९६४)
४) श्रीरंगराव कृष्णराव जगताप (२८.१०.१९६४ ते ३०. ६.१९६७)
५) माधवराव गेनबा तावरे (३१.६.१९६७ ते २१.१२.१९६७)
६) भीमदेवराव साधुजी गोफणे (२२.१२.१९६७ ते ३०. ६.१९६८)
७) माधवराव गेनबा तावरे (१९. ७.१९६८ ते ३०.११.१९६८)
८) शंकरराव गणेश दाते (१.१२.१९६८ ते ३०.११.१९६९)
९) गुलाबराव साहेबराव ढवाण (३०.११.१९६९ ते २०.१२.१९७०)
१०) माधवराव गेनबा तावरे (२६.१२.१९७० ते १२.१२.१९७३ )
११) वीरसिंह चंद्रसेन जाधवराव (१२.१२.१९७३ ते ३०. ७.१९७९)
१२) शिवलिंग संगमनाथ हिरेमठ ( ३१. ७.१९७९ ते २७.११.१९८५)
१३) चंद्रराव कृष्णराव तावरे (२८.११.१९८५ ते १७. ८.१९९२, ९. ९. १९९७ ते ५. ४.२०००, २०. ५.२००५ ते १५.११.२००७ )
१४) बाळासाहेब पाटील तावरे (२८. ९.१९९३ ते ८. ९.१९९७, १८.०९.२००२ ते १९. ५.२००५, १६.११.२००७ ते १८. ४.२०१५, ८. ३.२०२० ते २२.९.२०२३),
१५) संपतराव केशवराव तावरे (६. ४.२००० ते १७. ९.२००२)
१६) रंजनकुमार शंकरराव तावरे (१९.४.२०१५ ते ७. ३.२०२०)
१७) केशवराव सर्जेराव जगताप (२२.९.२०२३ ते ५.७.२०२५)