बापासाठी लेक मैदानात; काटी–लाखेवाडी गटात अक्षता ढोले यांचा सक्रिय प्रचार
विकासाची दिशा जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे कर्तव्य

बापासाठी लेक मैदानात; काटी–लाखेवाडी गटात अक्षता ढोले यांचा सक्रिय प्रचार
विकासाची दिशा जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे कर्तव्य
इंदापूर, आदित्य बोराटे –
काटी–लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक प्रचारात यावेळी एक भावनिक आणि प्रेरणादायी चित्र दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत पोपट ढोले यांच्या कन्या अक्षता ढोले स्वतः मैदानात उतरल्या आहेत. “बापासाठी लेक मैदानात” अशी चर्चा सध्या संपूर्ण गटात होत आहे.
प्रचारादरम्यान अक्षता ढोले म्हणाल्या की, “माझे वडील केवळ उमेदवार नसून ते दूरदृष्टीपूर्ण विचारसरणी असलेले नेतृत्व आहेत. काटी–लाखेवाडी परिसराचा विकास करत असताना शिक्षण, शेती, महिला सक्षमीकरण आणि युवकांचे भवितव्य या मुद्द्यांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरांकडे जावे लागू नये, यासाठी आधुनिक, अॅडव्हान्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रम स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

“आजची पिढी ही उद्याचा भारत आहे. युवकांना योग्य शिक्षण, संधी आणि मार्गदर्शन मिळाले तर संपूर्ण तालुक्याचा चेहरा बदलू शकतो,” असेही अक्षता ढोले यांनी स्पष्ट केले. महिलांच्या प्रश्नांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, “महिला सक्षमीकरण हा फक्त घोषवाक्य न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावा, यासाठी माझे वडील कटिबद्ध आहेत.”
लेक म्हणून नव्हे, तर जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रचारात उतरल्याचे सांगत अक्षता ढोले म्हणाल्या, “वडिलांचे विचार, प्रामाणिकपणा आणि विकासाची दिशा जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे कर्तव्य आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे युवक आणि महिला वर्गात विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.
अक्षता ढोले यांच्या सक्रिय सहभागामुळे काटी–लाखेवाडी गटातील निवडणूक प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून विकासासाठी पुढे येणाऱ्या नव्या पिढीचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.






