बाबासाहेब आंबेडकर हेच खरे घटनेचे शिल्पकार – डॉ. नरेंद्र जाधव
मातीशी नाळ जोडलेले भुमीपुत्र आणि भीमपुत्रांना बदलत्या युगात नव्या मार्गदर्शनाची गरज

बाबासाहेब आंबेडकर हेच खरे घटनेचे शिल्पकार – डॉ. नरेंद्र जाधव
मातीशी नाळ जोडलेले भुमीपुत्र आणि भीमपुत्रांना बदलत्या युगात नव्या मार्गदर्शनाची गरज
बारामती वार्तापत्र
भारताच्या संविधान निर्मितीचे काम १९४६ मध्ये सुरु झाले असले तरी त्याची प्रक्रिया यापूर्वी ५५ वर्षे सुरु होती, या काळात झालेल्या १२ प्रयत्नांपैकी ९ प्रयत्नांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहभाग होता. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने भारतीय घटनेचे शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले. ते बारामती येथे झालेल्या भीमपुत्र आयडॉल २०२५ या कार्यक्रमात बोलत होते.
भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या कार्यक्रमाने बारामतीच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाजातील युवकांना प्रेरणा देण्याचा, त्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या मातीशी नाळ जोडलेले भुमीपुत्र आणि भीमपुत्रांना बदलत्या युगात नव्या मार्गदर्शनाची गरज आहे.
अशा कार्यक्रमातून हे मार्गदर्शन होऊ शकते असे विचार या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूण्या खासदार सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केले. संविधान केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर आपल्या स्वप्नांचा, मुल्यांचा आणि आकांक्षांचा आरसा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई येथील डॉ. कल्पना सरोज, आग्र्याचा देवांश धनगर, ठाण्याचे डॉ. मुरहरी केळे, लखनौचे राजेश चंद्रा, हैद्राबादचे शेख चांद पाशा, नांदेडचे बाबुराव केंद्रे, नळदुर्गचे मारुती बनसोडे, अहिल्यानगरचे शंकर अंदानी आणि सुमन धामणे, अकलूजच्या डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, जेजुरीचे पांडुरंग सोनवणे आणि बारामतीचे डॉ. रोहन अकोलकर यांना यावेळी सन्मानचिन्ह आणि संविधानाची प्रत देऊन गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या कामगिरीची माहिती देणारी चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.
येथील संविधान विचार मंचाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संविधान विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे यांनी केले तर आभार सचिव घनश्याम केळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनील सावळे पाटील यांनी केले.