बाभूळगावमध्ये ग्रामस्थ,प्रशासनात झटापट; अतिक्रमणे हटविताना तहसीलदारांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ
अतिक्रमण केलेले ७ ते ८ पत्राशेड आहेत.

बाभूळगावमध्ये ग्रामस्थ,प्रशासनात झटापट; अतिक्रमणे हटविताना तहसीलदारांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ
अतिक्रमण केलेले ७ ते ८ पत्राशेड आहेत.
इंदापूर;प्रतिनिधि
बाभूळगाव (ता.इंदापूर) येथे उभारण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा घेत असताना अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या प्रशासनाबरोबर स्थानिकांचा वाद झाला. यावेळी तहसीलदारांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करण्यात आली तसेच मंडलाधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना मारहाण करण्यात आली.
याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात पाच जणांसह इतर दहा ते पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल उद्धव शिंदे (वय ४०, ग्राममहसूल अधिकारी, बाभूळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी २.० हा प्रकल्प बाभूळगाव (ता. इंदापूर) वेधील गायरान गट क्र. ३४२/१ येथे प्रस्तावित आहे.
या प्रकल्पाचे काम आवादा कंपनी करत आहे. या ठिकाणी अतिक्रमण केलेले ७ ते ८ पत्राशेड आहेत. हे अतिक्रमण काढण्याकरिता यापूर्वी नोटीस बजावत शुक्रवार (ता. २२) सकाळी हे अतिक्रमण काढण्यासाठी तहसीलदार जीवन बनसोडे, निवासी नायब तहसीलदार स्वाती राऊत,नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूरचे मंडळ अधिकारी अशोक पोळ, कालठाण नं २ ग्राममहसूल अधिकारी वैभव मुळे, हिंगणगावचे महसूल सेवक सुधीर पाडुळे यांच्यासह फिर्यादी आणि आजूबाजूचे गावचे पोलिस पाटील तसेच इंदापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी, आवादा कंपनीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढत असताना या वस्तीवरील नागरिकांनी यांनी जेसीबीच्या समोर उभे राहून आरडाओरडा करून काम बंद पाडले.
त्यानंतर रज्या चौवटया काळे याने फिर्यादीच्या हाताला धरून जमावामध्ये ढकलले. त्यावेळी एका महिलेने कॉलरला धरून गालात चापट मारली, तसे शेषराव चैन्या काळे व दोन महिलांनी तहसीलदार जीवन बनसोडे यांचे अंगावर धावत जात त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीनी मंडळ अधिकारी अशोक पोळ यांच्यावर दगडफेक केली. त्यामध्ये त्यांच्या हाताचे दोन्ही कोपऱ्याला जखम झाली असून पाठीवर दगडाच्या मारामुळे मुका मार लागला आहे.
यावरून रज्या चौवट्या काळे, शेषराव चैन्या काळे, सचित्र्या वाफ्या पवार (सर्व रा. बाभूळगाव) दोन महिलांसह अन्य दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनदांडग्यांची अतिक्रमणे कायम ?
ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांनी या भागात अनेक मोठ्या लोकांचे अतिक्रमणे आहेत.अनेकांनी मोठी घरे बांधली आहेत.
अतिक्रमणे करीत बारमाही पिके घेतली आहेत त्यांची अतिक्रमणे प्रशासनाकडून हटविण्यात येत नाहीत,असा आरोप करीत प्रशासनाच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला.