बारामतीकरांनो सावध व्हा! कोरोनापाठोपाठ आता बारामतीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ
शहरात डेंग्यूसोबतच चिकन गुनिया आणि इतर साथीच्या रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळायला सुरूवात झाली आहे.

बारामतीकरांनो सावध व्हा! कोरोनापाठोपाठ आता बारामतीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ
शहरात डेंग्यूसोबतच चिकन गुनिया आणि इतर साथीच्या रोगांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळायला सुरूवात झाली आहे.
बारामती वार्तापत्र
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आता कुठे सावरत असलेल्या बारामतीवर आता नवं संकट ओढावलं आहे. सध्या बारामतीत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने बदलणारे वातावरण आणि पाऊस या दोन्ही रोगांच्या प्रसारसाठी पोषक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती शहरासह ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण आजारी पडत असल्याने सरकारी आणि खासगी रुग्णालयांत गर्दी वाढली आहे.
चिकुनगुनियानेही डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळीच औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
एडिस इजिप्ती प्रजातीचा डास चावला तरच डेंग्यू होतो. हा डास चावलेली त्वचा अधिक लालसर दिसते. डास चावल्यानंतर साधारण ४
ते १० दिवसांत डेंग्यूची लक्षणे दिसतात. परिसरातील अनेक नागरिकांना खूप ताप येणे, अंगदुखी, अशक्तपणा, थकवा येणे, पोट दुखणे, स्नायूंमध्ये वेदना, अंगावर लाल पुरळ उठणे, डोळे
लाल होणे, खाण्याची इच्छा न होणे, वारंवार उलट्या होणे आदी लक्षणे जाणवू लागली आहेत. सूर्योदयानंतर दोन तास आणि दुपारी डेंग्यूचे डास खूप अॅक्टिव्ह
असतात. या काळात डेंग्यूचा डास चावण्याची शक्यता अधिक असते. या डासाचा एक दंशही डेंग्यूसाठी पुरेसा ठरत असल्याने डासांची उत्पत्ती नष्ट करणे गरजेचे आहे.
काय काळजी घ्याल?
• अंगभर कपडे घालूनच घराबाहेर पडा. डबके, साचलेल्या पाण्याजवळ थांबू नका.
• डासांपासून सुरक्षा देणाऱ्या साधनांचा वापर कर. घराजवळ व परिसरात कुठेही पाणी साचू देऊ नका. आहारातून प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा.
• झाडांना पाणी देताना ते साचणार नाही, याची काळजी घ्या.
डेंग्यूवरील उपचार
शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन देऊ नये, आजारपणात लिक्विड डाएट घ्यावा. नारळपाणी प्यावे, पपई, किवी, डाळिंब आणि हिरव्या भाज्या खाव्यात. डॉक्टरांच्या संपर्कात राहत प्लेटलेटची चाचणी करावी आदी उपाययोजना तज्ज्ञांकडून सुचविण्यात आल्या आहेत.
मोठ्या टाक्या, डबके यांमध्ये डासांची उत्पत्ती रोखणाऱ्या औषधांची फवारणी करा. घराच्या परिसरात पाणाी साचू देऊ नका. डास प्रतिबंधक जाळीचा वापर करा. घरात वावरतानाही अंगभर कपड्यांचा वापर करा.
वातावरण बदलल्यामुळे लहान मुलांमध्येही व्हायरल फिव्हरचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आरोग्याकडे विशेष सक्ष देणं गरजेचं आहे.
अचानक वाढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, डोळेदुखी ही डेंग्यूच्या आजाराची लक्षणं आहेत. यासोबतच कधीकधी डेंग्युमुळे रक्तस्रावही होऊ शकतो. असं झाल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्या.
कोरोनाचं सावटही पूर्णपणे गेलेलं नाही. त्यामुळे ताप जाणवल्यास डॉक्टरांना दाखवून आवश्यक चाचण्या करून घ्या.