बारामतीकर अनुभवणार बेसबॉलचा थरार ,टी.सी.कॉलेजमध्ये अखिल भारतीय बेसबॉल आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन
भारतातून ५९ पुरुष व ५५ महिला संघांनी सहभाग नोंदविला आहे.

बारामतीकर अनुभवणार बेसबॉलचा थरार ,टी.सी.कॉलेजमध्ये अखिल भारतीय बेसबॉल आंतरविद्यापीठ स्पर्धांचे आयोजन
भारतातून ५९ पुरुष व ५५ महिला संघांनी सहभाग नोंदविला आहे.
बारामती वार्तापत्र
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २ जानेवारी ते दि. १० जानेवारी २०२६ दरम्यान अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बेसबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. पुरुष व महिला गटातील या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून ५९ पुरुष व ५५ महिला संघांनी सहभाग नोंदविला आहे. दोन्ही स्पर्धात खेळाडू, मार्गदर्शक व पंच मिळून जवळपास २००० व्यक्ती बारामतीत येतील.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य महाविद्यालय असून शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात नावाजलेले महाविद्यालय तसेच देशभरातील बोटांवर मोजता येणा-या महाविद्यालयांपैकी ‘ए++’ दर्जा प्राप्त महाविद्यालय आहे. यापूर्वी या महाविद्यालयाने ७ आंतरविद्यापीठ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. अशी कामगिरी करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील हे एकमेव महाविद्यालय आहे. या महाविद्यालयास अधिकार प्रदत्त महाविद्यालय अशी मान्यता मिळाली असून राज्य व विद्यापीठ पातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
बेसबॉल हा खेळ एक नाविन्यपूर्ण खेळ असून चपळता, दमसास, दिशाभिमुखता, स्फोटक क्षमता या सर्व शारीरिक क्षमतांचा कस या खेळात लागतो.
या महाविद्यालयाचे अनेक खेळाडू या खेळात आंतरराष्ट्रीय तसेच आंतरविद्यापीठ, राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळले असून या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा नावलौकिक संपूर्ण देशात आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी सांगितले.
‘अभ्यासाबरोबर खेळातही विद्यार्थी चमकावेत यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो व त्यांना संस्था पातळीवर जी आवश्यक मदत संस्था तत्परतेने देते’.
अशा या स्पर्धा भरविण्याची संधी महाविद्यालयास प्राप्त झाली आहे व हि समस्त बारामतीकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळांचे आयोजन केले असून देशभरातील नामांकित खेळाडूंचा खेळ विद्यार्थ्यांना पाहता येतो व त्यातूनच अनेक खेळाडू तयार होतात. बारामतीकरांना या स्पर्धा पाहण्याचे संस्थेचे पदाधिकारी व सर्व सदस्य आवाहन यांनी केले आहे.






