बारामतीचा विकास फक्त तीन किलोमीटरच का?पिंपळीतील डोर्लेवाडी ते गाडेवस्ती रस्ता अंतर्गत वादामुळे रखडला;ग्रामस्थांना मोठी गैरसोय
ग्रामपंचायतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांचे वर्चस्व

बारामतीचा विकास फक्त तीन किलोमीटरच का?पिंपळीतील डोर्लेवाडी ते गाडेवस्ती रस्ता अंतर्गत वादामुळे रखडला;ग्रामस्थांना मोठी गैरसोय
ग्रामपंचायतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांचे वर्चस्व
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका म्हटलं की सर्वांसमोर येते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला विकास परंतु बारामती पासून तीन किलोमीटर अंतरावर पिंपळी ग्रामपंचायतच्या हद्दीत येणारा डोर्लेवाडी ते गाडेवस्ती या भागाला जोडणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून गावातील अंतर्गत वादामुळे रखडलेला आहे. या रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न केले, मात्र दोन कुटुंबांतील तणावामुळे रस्त्याचे काम वारंवार थांबवले जात आहे.
यामुळे स्थानिक नागरिकांना रोजच्या जीवनात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिंपळी गावाची ग्रामपंचायत ही यापूर्वीही राज्यभर चर्चेत आली होती, जेव्हा सरपंचाची निवड ‘कुणबी’ दाखल्याच्या आधारे झाली होती. या ग्रामपंचायतीवर उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांचे वर्चस्व असल्याचे बोलले जाते. मात्र, अशा प्रभावशाली नेतृत्वाच्या गावातही रस्ता काम रखडल्याचे वास्तव ग्रामस्थांसाठी दुर्दैवी आहे.
रस्त्याच्या अभावामुळे सुरक्षेचा प्रश्न
रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्यामुळे त्या भागात चारचाकी वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद आहे. याचा गैरफायदा चोरट्यांनी घेतला असून, गेल्या सहा महिन्यांत तीन ते चार घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक आपली घरे बंद करून कामावर जाताना अस्वस्थ आहेत.
प्रशासनाची उदासीन भूमिका
या समस्येकडे प्रशासन गांभीर्याने पाहत नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. केवळ पाहणी करून माघारी फिरणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे रस्त्याचे काम तसंच थांबलेले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी पोलीस विभागाकडे रस्त्याच्या कामासाठी बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली असून, यासंबंधीचे निवेदनही देण्यात आले आहे.
ग्रामस्थांची मागणी – वाद मिटवा, रस्ता पूर्ण करा
गावातील अंतर्गत वाद मिटवून रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत आहे. दोन कुटुंबांतील व्यक्तिगत भांडणामुळे संपूर्ण वस्तीचे हाल होणे योग्य नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आता बारामती प्रशासन या प्रलंबित प्रश्नाकडे केव्हा लक्ष देते आणि रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा मिळवून देते, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.