बारामतीची दिया छाजेड व इशिका अडसूळ यांचा जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर भारताचा झेंडा
जगातील ७० प्रगत देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग

बारामतीची दिया छाजेड व इशिका अडसूळ यांचा जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिपवर भारताचा झेंडा
जगातील ७० प्रगत देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग
बारामती वार्तापत्र
उत्तर युरोपातील एस्टोनियात ७० देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागे टाकत जगात प्रथम क्रमांक पटकविला बारामती — उत्तर युरोप खंडातील एस्टोनिया देशात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत यावर्षी बारामती येथील दिया प्रीतम छाजेड व इशिका अभिजीत अडसूळ या दोन भारतीय विद्यार्थिनींनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
जगातील ७० प्रगत देशांतील २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघींनीही सर्व फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत प्रथम क्रमांक पटकावून जगात ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळवला आहे.
यापूर्वी भारतात पार पडलेल्या राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत दियाने दैदीप्यमान यश मिळवले होते. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती. तिच्यासोबत इशिका अडसूळ हिनेही राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक स्पर्धेचे दार खुले केले होते.
एस्टोनिया येथे झालेल्या या जागतिक स्पर्धेत दहा विविध कॅटेगिरींमध्ये, सर्व वयोगटांतील स्पर्धक सहभागी झाले होते. अमेरिका, युरोप व आशिया खंडातील प्रगत देशांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज संघ या स्पर्धेत उतरले होते. मात्र, नावीन्यपूर्ण कल्पना, अचूक सादरीकरण व आत्मविश्वासाच्या जोरावर दिया व इशिका यांनी या प्रगत देशांच्या प्रमुख संघांनाही पराभूत करत अंतिम विजेतेपद मिळवले.
दोघीनी तयार केलेला मोबाईलवर ऑपरेट होणारा शेतीसाठी उपयुक्त रोबोट हा या स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरला. हा रोबोट पेरणी, फवारणी व नांगरणी यासारखी अनेक शेतीकामे एकाच यंत्राद्वारे करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन कष्टही मोठ्या प्रमाणात कमी होतात. तापमान, हवामानातील बदल व वातावरणातील आर्द्रता मोजण्याची क्षमताही या रोबोटमध्ये आहे.
आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना दोघींनी सांगितले की, “भारत हा कृषीप्रधान देश आहे. अन्न हे जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. ते अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांना अपार कष्ट करावे लागतात. शेतकऱ्यांचे कष्ट कमी करून कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल, या उद्देशानेच मी हा रोबोट तयार केला. पणजोबा, आजोबा,वडील हे शेतकरी असल्याने शेतकऱ्यांविषयी आपुलकी व प्रेम असल्याचेही तिने नमूद केले.
या यशाबद्दल दोघींना मिळून एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात आले असून, लवकरच सुवर्णपदकही प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या दोघींनी दिली.
दिया आणि इशिका सध्या बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या विनोदकुमार गुजर बाल विकास मंदिर प्रशालेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे.
तिच्या या प्रवासात आई शितल छाजेड, वडील प्रीतम छाजेड तसेच शाळेतील शिक्षिका आस्मा मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. इशिका अडसूळ हिलाही पालक व शिक्षकांचे भक्कम पाठबळ लाभले आहे.
या ऐतिहासिक यशामुळे पुणे जिल्ह्यासह बारामती सह संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून विविध शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांकडून दोघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या विद्यार्थिनींचे यश आगामी पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.






