बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची शरद पवार सहकुटुंब सदिच्छा भेट
“पवार कुटुंबाकडून मला नेहमीच मार्गदर्शन, प्रेरणा आणि विश्वास मिळाला आहे.

बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांची शरद पवार सहकुटुंब सदिच्छा भेट
“पवार कुटुंबाकडून मला नेहमीच मार्गदर्शन, प्रेरणा आणि विश्वास मिळाला आहे.
बारामती वार्तापत्र
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती नगरपालिका निवडणुकीत सातव कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील तरुण नेतृत्व म्हणून सचिन सातव यांनी नगराध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत एक महत्त्वाचा राजकीय टप्पा गाठला आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत बारामतीच्या राजकारणात आपली ठसठशीत छाप उमटवली आहे.
नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सचिन सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि राज्याच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्त्व शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आज बारामतीतील गोविंद बाग येथे संपूर्ण सातव कुटुंबीयांनी शरद पवार यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान शरद पवार यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांचे विशेष कौतुक केले. बारामती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि जबाबदारीने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. नगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या भेटीत सातव आणि पवार कुटुंबातील सामाजिक, राजकीय व वैयक्तिक नातेसंबंधांचा दीर्घकालीन वारसा अधोरेखित झाला. अनेक दशकांपासून बारामतीच्या विकासात या दोन्ही कुटुंबांचे योगदान राहिले असून, नव्या पिढीकडून ही परंपरा पुढे नेली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष सचिन सातव यांनी पवार कुटुंबाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “पवार कुटुंबाकडून मला नेहमीच मार्गदर्शन, प्रेरणा आणि विश्वास मिळाला आहे. त्यांचे आशीर्वाद हेच माझ्या राजकीय वाटचालीचे खरे बळ आहे. बारामतीच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास विकासकामांच्या माध्यमातून नक्कीच सार्थ ठरवेन,” असे त्यांनी सांगितले.
या सदिच्छा भेटीमुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा रंगल्या असून, आगामी काळात शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.






