मुरुम व दगडाचे उत्खनन करून करोडो रुपयांची लूट.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी...

मुरुम व दगडाचे उत्खनन करून करोडो रुपयांची लूट.
ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी…
बारामती वार्तापत्र
खामगळवाडी (ता.बारामती) येथील दगड खाणीतून बेकायदा मुरुम व दगडाचे उत्खनन करून शासनाची करोडो रुपयांची लूट करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी घंटानाद आंदोलन करून खाणी बंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोटाळ्याकडे लक्ष घालण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
खामगळवाडी ता.बारामती येथील दगड खाणीतून रूपचंद खत्री रा.बारामती या ठेकेदाराने गट नंबर २९ मधुन २१ हजार ब्रासची उत्खनन परवानगी असताना हजारो ब्रास मुरुम व दगडाचे उत्खनन करून शासनाची करोडो रुपयांची लूट केली गेली आहे. या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्यांचे कडुन बुडवलेली रॉयल्टी वसुल करावी यासाठी (दि:१३) रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या घंटानाद आंदोलनाची सुरूवात पणदरे बाजारतळ येथुन करण्यात आली. खामगळवाडी येथे शेकडो ग्रामस्थांनी एकत्र जमून घंटानाद आंदोलन करून निषेध सभा घेतली.यावेळी विक्रम कोकरे, अशोक खामगळ, ज्ञानदेव खामगळ, व इतरांनी मनोगत व्यक्त करुन ठेकेदारावर कारवाईची मागणी केली.
दरम्यान भ्रष्टाचार करणा-या अधिका-यांवर कारवाई झालीच पाहिजे,शासनाचा महसूल बुडणा-यावर कारवाई करा, गावाचा महसूल बुडवणा-या अधिका-यांवर कारवाई करा अशा घोषणा दिल्या जात होत्या.