क्राईम रिपोर्ट

बारामतीच्या परिसरात पोलीस भरतीसाठी इंजेक्शन घेतलेल्या उमेदवारावर कारवाई

भरती प्रक्रियेतून कायमचे बाद

बारामतीच्या परिसरात पोलीस भरतीसाठी इंजेक्शन घेतलेल्या उमेदवारावर कारवाई

भरती प्रक्रियेतून कायमचे बाद

क्राईम;बारामती वार्तापत्र

पोलीस भरतीला मैदानी चाचणी चांगली कामगिरी करण्यासाठी शरीरात इंजेक्शन घेताना उमेदवारावर कारवाई

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांतर्गत ९२१ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.या भरती प्रक्रियेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मैदानी चाचणी दरम्यान चांगली कामगिरी करण्यासाठी शरीरात उत्तेजित द्रव्य (ड्रग्ज) इंजेक्शन द्वारे टोचत असताना एका उमेदवाराला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

साहिल शंकर अवघडे (२३) असे या उमेदवाराचे नाव आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय येथे शिपाई पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. एकूण ९२१ रिक्त पदे भरली जाणार असून शुक्रवार पासून शारीरिक चाचण्यांना प्रारंभ झाला आहे. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजल्यापासून उमेदवारांना प्रवेश दिला जात होता. यात सोमवारी २ हजार ५०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले होते.

मैदानात अंमली पदार्थ तपासणीचे गस्ती पथकाकडून गस्त सुरू असताना शंभर मीटर ट्रॅकजवळच्या बिस्कीट आणि ग्लुकोजच्या तंबूच्या मागील बाजूच्या आडोशाला उभे राहून शरीरात उत्तेजित द्रव्य (ड्रग्ज) इंजेक्शन द्वारे टोचत असताना सापडला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला तात्काळ शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. साहिल शंकर अवघडे (२३) असे या उमेदवाराचे नाव असून तो जंक्शन बारामती पुणे येथील राहणारा आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार सुशांत मुर्गे यांच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलीस ठाण्यात औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० चे कलम १८ (क) (१), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलीस प्रशासनाचे उमेदवारांना आवाहन

​मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अपर पोलीस आयुक्तांनी उमेदवारांना कडक इशारा दिला आहे. “कोणत्याही उमेदवाराने भरती प्रक्रियेत उत्तेजक द्रव्ये किंवा अंमली पदार्थांचे सेवन करू नये. असे कृत्य करताना आढळल्यास संबंधित उमेदवारावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि त्याला भरती प्रक्रियेतून कायमचे बाद केले जाईल,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मैदानावर कडेकोट बंदोबस्त

​पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण मैदानात सीसीटीव्हीच्या कक्षेत आणले आहेत.​६९ हँडीकॅम पथके, ​२० पोलीस अंमलदारांचे विशेष अंमली पदार्थ तपासणी पथक, ​दोन फिरती पथके आणि डॉक्टरांचे पथक देखील मैदानावर सज्ज ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Back to top button