बारामतीच्या रस्त्यांवर आरटीओची ‘नाईट वॉच’! मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई
अचानक तपासणी अन् ६ जणांवर कारवाई

बारामतीच्या रस्त्यांवर आरटीओची ‘नाईट वॉच’! मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई
३१ वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरने तपासणी; मद्यप्राशन करून वाहन चालवणारे ६ जण कारवाईच्या कचाट्यात
बारामती वार्तापत्र
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी ‘Drink and Drive’ विरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत विविध ठिकाणी वाहनचालकांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान एकूण ३१ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ वाहनचालक मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळून आले. संबंधित वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली.
ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
⚠️ “दारू पिऊन वाहन चालवू नका!”
मद्यप्राशन केल्यानंतर वाहन चालविल्यास चालकाची निर्णयक्षमता, प्रतिक्रिया देण्याचा वेग आणि वाहनावरील नियंत्रण कमी होते. परिणामी गंभीर अथवा प्राणघातक अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे मद्यप्राशन करून वाहन चालविणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवितासाठी धोकादायक असल्याचे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले.
मद्यप्राशन केले असल्यास सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी किंवा मद्यप्राशन न केलेल्या वाहनचालकाची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
🚔 अचानक तपासणी सुरूच राहणार!
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना प्रतिबंध करण्यासाठी ‘Drink and Drive’ तपासणी मोहीम यापुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. विविध ठिकाणी अचानक तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आरटीओकडून देण्यात आला आहे.






