आपला जिल्हाराजकीय

बारामतीच्या राजकीय मैदानात रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा! “पुढील तीन वर्षे ताकद द्या, सत्तेत आपणच येणार!”

२०२९ च्या राजकीय लढतीचे संकेत?

बारामतीच्या राजकीय मैदानात रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा! “पुढील तीन वर्षे ताकद द्या, सत्तेत आपणच येणार!”

२०२९ च्या राजकीय लढतीचे संकेत?

बारामती वार्तापत्र 

बारामतीतील राजकीय वातावरण तापवणाऱ्या सभेत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. पदवीधर उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सभेत त्यांनी बारामतीतील कायदा-सुव्यवस्था, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कथित भ्रष्टाचारावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

“आधी बारामतीत कायदा-सुव्यवस्थेची शिस्त होती, आता काय चाललंय?” असा सवाल करत रोहित पवार यांनी शहरातील सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत बारामतीची पूर्वीची शिस्त पुन्हा निर्माण करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

“सत्तेत असूनही प्रश्न सुटत नसतील, तर काय लोणचं घालायचं?”

सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ असूनही जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची टीका करत रोहित पवार यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विधानसभेत विरोधकांचे संख्याबळ कमी असले, तरी आवाज कमी नसल्याचे सांगत विधानपरिषदेत ताकद वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा; २०२९ कडे लक्ष

“एमपीएससीचा लढा झाला, आता येणारा लढा शेतकऱ्यांचा असेल,” असे सांगत त्यांनी येत्या १२ दिवसांत मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. बेरोजगारी, एमआयडीसीतील रोजगार आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरही त्यांनी सरकारवर टीका केली.

दरम्यान, २०२९ च्या बारामती विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष रंगणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. रोहित पवार यांनी २०२९ मध्ये सत्ता मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला; मात्र त्यांनी स्वतः बारामतीतून निवडणूक लढवण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

पदवीधर-शिक्षक निवडणुकीच्या प्रचारातून बारामतीतील कायदा-सुव्यवस्था आणि आगामी विधानसभा निवडणुकीचे राजकीय मुद्दे ऐरणीवर आले आहेत. आता रोहित पवारांच्या आरोपांवर सत्ताधारी काय प्रत्युत्तर देतात आणि शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा काय ठरते, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button