बारामतीच्या रुग्णालयास यंत्रसामग्री खरेदीसाठी 84 कोटीचा निधी राज्य शासनाने केला मंजूर
बारामतीसह सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे.
बारामतीच्या रुग्णालयास यंत्रसामग्री खरेदीसाठी 84 कोटीचा निधी राज्य शासनाने केला मंजूर
बारामतीसह सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे.
बारामती वार्तापत्र
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील यंत्रसामग्री आणि साधनसामग्री खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने बुधवारी (ता.24) 84 कोटी 86 लाख रुपयांचे अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या बाबतचा अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला. यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम पूर्णत्वास जाण्यास गती प्राप्त होणार आहे.
बारामती एमआयडीसीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज गतवर्षापासूनच सुरु झाले असून रुग्णालयाचे काम प्रगतीपथावर आहे. या साठी आवश्यक यंत्रसामग्री खरेदीसाठी निधीची गरज होती, आता शासनाने तब्बल 84 कोटींचा निधी मंजूर केल्यामुळे हे काम वेगाने मार्गी लागणार आहे.
बारामतीसह सातारा, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनाही याचा लाभ होणार आहे. या मध्ये दंतशल्यचिकित्साशास्त्र, स्त्री रोग व प्रसूती शास्त्र, औषधवैद्यक शास्त्र, क्षय व उरोरोगशास्त्र, नेत्रशल्यचिकित्सा, बालरोग शास्त्र, कान, नाक व घसा, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, बधिरीकरण शास्त्र, क्ष किरणशास्त्र, मनोविकारशास्त्र, मध्यवर्ती औषध भांडार, रक्तपेढी, शल्यचिकित्साशास्त्र व त्वचा आणि गुप्तरोग विभागासाठी हे अनुदान प्रदान करण्यात आले आहे. सदरची यंत्रसामग्रीची खरेदी हाफकिन बायो फार्मास्युटिकल्स कार्पोरेशन लिमिटेडच्या वतीने करण्याचे निर्देश यात आहेत. प्रत्येक विभागाला लागणा-या सर्व बाबींची सखोल यादी या अध्यादेशात नमूद करण्यात आली आहे.