राजकीय

बारामतीच्या विश्वासू शिलेदाराकडे पुणे जिल्ह्याची सूत्रे संभाजी नाना होळकर पुणे जिल्हा ग्रामीणचे नवे ‘कारभारी’

प्रदीप गारटकर पक्षात असताना त्यांच्याकडे पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

बारामतीच्या विश्वासू शिलेदाराकडे पुणे जिल्ह्याची सूत्रे
संभाजी नाना होळकर पुणे जिल्हा ग्रामीणचे नवे ‘कारभारी’

प्रदीप गारटकर पक्षात असताना त्यांच्याकडे पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होती.

बारामती वार्तापत्र

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू झालेला अंतर्गत तणाव आता थेट नेतृत्वबदलापर्यंत येऊन पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बारामतीतील विश्वासू सहकारी संभाजी नाना होळकर यांच्याकडे सोपवली आहे.

इंदापूर निवडणूक आणि तणावाची ठिणगी इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि अजित पवार यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.

नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रदीप गारटकर यांनी थेट पक्षाच्या सदस्यत्वासह जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. हा निर्णय पक्षासाठी धक्कादायक मानला जात होता.
निवडणूक पार पडल्यानंतर गारटकर पुन्हा अजित पवार यांच्याशी समेट करतील आणि राष्ट्रवादीत सक्रिय होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आणि नेतृत्वात बदल अपरिहार्य ठरला.

संभाजी नाना होळकर यांच्याकडे जबाबदारी
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे संभाजी नाना होळकर यांच्या हाती दिली. या नियुक्तीमुळे पक्षात नव्या बांधणीला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत.

या नियुक्तीची अधिकृत माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले,“संभाजी नाना होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे.

पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची ध्येय-धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ते प्रभावीपणे काम करतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

चार महत्त्वाच्या तालुक्यांची जबाबदारी संभाजी नाना होळकर यांच्या खांद्यावर बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या तालुक्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे तालुके अजित पवारांच्या राजकारणाचे केंद्र मानले जात असल्याने या नियुक्तीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

अजित पवारांचे जुने आणि निष्ठावंत सहकारी संभाजी नाना होळकर हे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष होते. गेल्या २० ते २५ वर्षांपासून ते अजित पवारांसोबत सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षफुटीचा अत्यंत अवघड काळ असतानाही संभाजी होळकर यांनी अजित पवारांची साथ सोडली नव्हती. त्यांच्या या निष्ठेमुळेच पुणे जिल्ह्यासारखी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुणे जिल्ह्यात नव्या बांधणीचे संकेत प्रदीप गारटकर पक्षात असताना पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र त्यांच्या बाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी होळकर यांची नियुक्ती झाल्याने पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी आणि संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Back to top button