बारामतीतील अपघात टाळण्याच्यादृष्टीने अवजड वाहन चालविताना विशेष काळजी घ्या-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम
अवजड वाहने विशेषः टिप्पर सारख्या वाहनांची कागदपत्रे विधीग्राह्य करुन घ्यावे.

बारामतीतील अपघात टाळण्याच्यादृष्टीने अवजड वाहन चालविताना विशेष काळजी घ्या-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम
अवजड वाहने विशेषः टिप्पर सारख्या वाहनांची कागदपत्रे विधीग्राह्य करुन घ्यावे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहर व परिसरात अवजड वाहन चालविताना विशेष काळजी घेऊन अपघात होणार नाही, याकरिता टिप्पर किंवा बांधकाम साहित्य वाहतूक करतांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन करावे, अशा सूचना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केल्या.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शहर व परिसरामध्ये अपघात टाळण्याच्यादृष्टीने शासकीय कंत्राटदार यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक मंगळवारी (7 ऑक्टोबर) आयोजित करण्यात आली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक वैभव जाधव, मोटार वाहन निरीक्षक नितिन घोडके, परिवहन विभागातील कर्मचारी, निलेश काटे, मे. ए.एस. देशमुख कंपनी, मे. व्हि. एच. खत्री, मे. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, मे. ए.व्ही.टी. इन्फ्रास्टक्चर, मे. रवी इंटरप्रायजेस, मे. निखिल कन्स्ट्रक्शन, मे. दत्त इन्फ्रा, मे. शिवा स्ट्रक्चर आदी शासकीय कंत्राटदाराचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. निकम म्हणाले, बारामती शहर वाहतूक पोलिसांमार्फत निर्गमित आदेशातील नमूद वेळ व त्या अनुषंगिक सूचनांचे पालन करुन वाहनांची वाहतूक करावी. अवजड वाहने विशेषः टिप्पर सारख्या वाहनांची कागदपत्रे विधीग्राह्य करुन घ्यावे. अवजड वाहने वापरतांना किंवा चालविताना मोटार वाहन कायद्यातर्गत असलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे. याबाबत वाहनचालकांना सूचना देण्यात याव्यात. अवजड वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांच्या कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करुन वैध कागदपत्रे असलेल्या वाहनचालकांच्या ताब्यात वाहने देण्यात यावीत. वाहनचालकाच्या अडीअडचणीचे आपल्यास्तरावरुन निराकरण करण्यात यावे, अशा सूचना श्री. निकम यांनी दिल्या.
प्रबोधन शिबीरात वाहनचालकांना रस्ता सुरक्षा, वाहतुकीच्या नियमांविषयी मार्गदर्शन
बारामती शहर व परिसरातील विविध शासकीय कंत्राटदार यांच्या वाहनचालकांसाठी कार्यालयाच्यावतीने प्रबोधन शिबीर आयोजन करण्यात आले, यामध्ये रस्ता सुरक्षा, वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती देवून नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपघाताच्या प्रमाणात घट होण्याकरिता प्रबोधन शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही श्री. निकम म्हणाले.