बारामतीतील ‘आशा ताईं’च्या हाती पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरचे आयुध; रुई ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण; बारामतीच्या 1 लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक 30’चा दुसरा डोस.
बारामतीतील ‘आशा ताईं’च्या हाती पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरचे आयुध; रुई ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरण; बारामतीच्या 1 लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक 30’चा दुसरा डोस.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील आशा वर्करसाठी पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनर तसेच रुई ग्रामीण रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच मुंबईतील उद्योजक आशिष पोतदार यांच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील 1 लाख कुटुंबांसाठी देण्यात आलेल्या ‘आर्सेनिक 30’ गोळ्यांचा दुसरा डोस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरोग्य विभागाकडे सुपुर्द करण्यात आला.
येथील विद्या प्रतिष्ठानच्या ‘व्हिआयटी’ सभागृहात ‘कोरोना आढावा’ बैठक घेण्यात आली. यावेळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद कांकडे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते.
‘डीपीसी’च्या स्थानिक आमदार निधीतून ‘कोरोना’ विरुध्दच्या लढाईसाठी बारामती तालुक्यासाठी 10 लाख रुपयांच्या पल्स ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरची खरेदी करण्यात आली आहे. तालुक्यातील अशा वर्करसाठी या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या 168 पल्स ऑक्सिमीटर आणि 277 थर्मल स्कॅनरचे वितरण आरोग्य विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या नवीन उपकरणांच्या सहाय्याने ‘चेस द व्हायरस’ या अभियानाला गती येणार आहे. त्यामुळे ‘कोरोना’ बाधितांना ओळखणे सोपे होणार असून ‘कोरोना’ची साखळी तोडण्यास मदत होणार आहे.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या स्थानिक ‘कोविड-19 बारामती मदत निधी फंडा’तून 17 लाख 30 हजार रुपये किंमतीची अत्याधुनिक रुग्ण्वाहिका खरेदी करण्यात आली आहे. वातानुकुलीत असणाऱ्या या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर, ॲटोमॅटीक स्ट्रेचरची सुविधा आहे. रुई ग्रामीण रुग्णालयासाठी खरेदी करण्यात आलेल्या या रुग्ण्वाहिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.
त्याचबरोबर ‘कोरोना’ विरुध्दच्या लढाईत बारामतीकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आर्सेनिक 30’ या होमिओपॅथी औषधांचा दुसरा डोस बारामतीकरांसाठी देण्यात आला. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या समन्वयातून मुंबईचे उद्योजक आशिष पोतदार यांच्या माध्यमातून गेल्या महिन्यात बारामतीमधील 1 लाख कुटुंबियांना या गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते. आज पुन्हा त्यांच्याच माध्यमातून 1 लाख गोळ्यांच्या डब्यांचा दुसरा डोस बारामतीकरांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या गोळ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरोग्य विभागाला सुपुर्द करण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या माध्यमातून या गोळ्यांचे तालुक्यात मोफत वितरण करण्यात येणार आहे.