बारामतीतील उरूस साधेपणाने साजरा होणार
संदल मिरवणूक, आतिषबाजी, पाळणे, कुस्ती आखाडा, तमाशा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

बारामतीतील उरूस साधेपणाने साजरा होणार
संदल मिरवणूक, आतिषबाजी, पाळणे, कुस्ती आखाडा, तमाशा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
बारामती वार्तापत्र
बारामतीतील ऐतिहासिक व हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत चांदशाहवली दर्गा येथे होणारा वार्षिक उरूस उत्सव यंदा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय दर्गा समितीने घेतला आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.
दरवर्षी मोठ्या उत्साहात, पारंपरिक धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य संदल मिरवणुकीसह साजरा होणारा हा उरूस बारामतीसह परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. विविध धर्मीय नागरिक मोठ्या श्रद्धेने या उरूसमध्ये सहभागी होत असतात. मात्र यंदा शहरात असलेल्या शोकभावनेचा आदर राखत उत्सवावर साधेपणाची छाप ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
समितीच्या निर्णयानुसार यावर्षी संदल मिरवणूक, आतिषबाजी, पाळणे, कुस्ती आखाडा, तमाशा तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच उरूस निमित्त भरवण्यात येणाऱ्या जत्रेसदृश कार्यक्रमांवरही मर्यादा घालण्यात येणार आहेत. गर्दी टाळणे आणि उत्सवी वातावरण कमी ठेवणे, हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
तथापि, धार्मिक विधी आणि पारंपरिक पूजा-अर्चा नियमानुसार पार पाडण्यात येणार असून श्रद्धाळूंना दर्शनासाठी आवश्यक व्यवस्था केली जाणार आहे. श्रद्धा आणि एकात्मतेची भावना अबाधित ठेवत शांततेत उरूस साजरा करण्याचे आवाहन दर्गा समितीने नागरिकांना केले आहे.
बारामती शहरात हा उरूस केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे प्रतीक मानला जातो. यंदाचा साधेपणाचा निर्णय हा दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच समाजात शांतता आणि ऐक्याचा संदेश देणारा ठरत आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडूनही या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी संयम व सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






