स्थानिक

बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरच्या कामात दिरंगाई; वाहनधारकांना सातारा–अकलूजच्या वाऱ्या

फिटनेससाठी सातारा व अकलूज येथे जावे लागत आहे.

बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरच्या कामात दिरंगाई; वाहनधारकांना सातारा–अकलूजच्या वाऱ्या

फिटनेससाठी सातारा व अकलूज येथे जावे लागत आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहरात नव्याने सुरू होणाऱ्या ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरचे काम अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांनुसार वाहनांच्या फिटनेस तपासणीसाठी ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरची आवश्यकता बंधनकारक करण्यात आली आहे.

मात्र, या नियमांच्या अंमलबजावणीमुळे बारामती इंदापूर आणि दौंड तालुक्यातील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटरचे काम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देखरेखीखाली जोरात सुरू होते. मात्र, त्यांच्या निधनानंतर कामात मंदी आल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठ पातळीवर कामाची पाहणी, सूचना व पाठपुरावा होत नसल्याने काम थांबले असून नागरिकांना वाहन पासिंगसाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे.

सध्या बारामती व आसपासच्या भागातील वाहनधारकांना वाहन फिटनेससाठी सातारा व अकलूज येथे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासखर्च, वेळ आणि श्रम वाया जात असून हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री यांचे पहाटेचे दौरे व विकासकामांवरील काटेकोर लक्ष प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर हा वारसा कोण पुढे नेणार, बारामतीच्या विकासकामांचे काय होणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

दरम्यान,मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे येथील आरटीओ कार्यालयातही अशाच प्रकारची अडचण होती. मात्र तेथील अधिकाऱ्यांनी मुदतवाढ मागून परिस्थिती हाताळली. त्याच धर्तीवर बारामतीसाठीही मुदतवाढ का मिळाली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांना विचारले असता “काम लवकरच सुरू होईल” अशी उत्तरं दिली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.तसेच बारामती येथे पासिंग साठी मुदतवाढ होण्यासाठी येथली अधिकाऱ्यांनी कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे निदर्शनात आले आहे.त्यामुळे येथील अधिकाऱ्यांनी कामात दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे.दुसरीकडे,पासिंग इतर शहरांत होत असल्याने स्थानिक एजंट, गॅरेजधारक आणि संबंधित व्यवसायिकांवरही आर्थिक परिणाम होत असून स्थानिक रोजगारावर गदा येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

एकूणच,बारामतीतील ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर लवकरात लवकर सुरू करून नागरिकांची गैरसोय थांबवावी,अशी मागणी आता जोर धरत आहे.

Back to top button