स्थानिक

बारामतीतील किरण गुजर यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार जाहीर

नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील ४५ वर्षांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल

बारामतीतील किरण गुजर यांना बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार जाहीर

नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील ४५ वर्षांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल

बारामती वार्तापत्र 

नाट्य, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात गेली चार दशके सातत्यपूर्ण आणि समर्पित कार्य करणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांना ‘बालगंधर्व विशेष सन्मान पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पुणे बालगंधर्व परिवाराच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार बालगंधर्व रंगमंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदान केला जाणार आहे.
हा विशेष सन्मान सोहळा मंगळवार, दिनांक २४ जून २०२५ रोजी, दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंग मंदिर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राज्यभरातील विविध नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ कलाकार व कलावंत उपस्थित राहणार आहेत.
चार दशके अखंड नाट्य सेवा
किरण गुजर यांनी १९७९ पासून नाट्य क्षेत्रात आपले योगदान देण्यास सुरुवात केली. त्यांच्या नटराज नाट्य कला मंडळाने आतापर्यंत ४९ नाटकांची निर्मिती केली असून, १९८१ पासून सलगपणे पारितोषिके मिळवत त्यांनी आपल्या नाट्य संस्थेची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यशस्वी नाट्य संमेलने व उपाध्यक्षपद
गुजर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे. १९९५ आणि २०१२ या वर्षांमध्ये बारामती येथे दोन भव्य दिव्य नाट्य संमेलनांचे यशस्वी आयोजनही त्यांनी केले होते.
पुरस्कारांची शिदोरी
त्यांच्या कार्याची दखल घेत आजवर नाट्य गौरव, कला गौरव आणि जीवन गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. याशिवाय, राज्यभरातील कलाकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
बारामतीत रंगणारी संस्कृतीची ज्योत
बारामती येथे गेली २० वर्षे विविध उपक्रमांतून त्यांचे कार्य अविरतपणे सुरू आहे. यामध्ये
• स्वस्त नाटक योजना
• लावणी महोत्सव
• ज्येष्ठ कलावंत गौरव सोहळे
• नाट्य व नृत्य प्रशिक्षण शिबिरे
• राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
• बारामती गणेश फेस्टिवल
यांचा समावेश होतो.
नटराज कलादालन – नवसंस्कृतीचं केंद्र
गुजर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या ‘नटराज कलादालन’ या वास्तूत दर रविवारी ‘कलाकार कट्टा’ हा उपक्रम राबवण्यात येतो. येथे चित्रप्रदर्शने, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम होत असून कलाकारांसाठी विनामूल्य विश्रामगृहाची सुविधा देखील उपलब्ध आहे.
या पुरस्काराच्या निमित्ताने किरण गुजर यांच्या कार्याला एक मोठा सन्मान प्राप्त झाला असून, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी हे निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Back to top button